Anil Deshmukh on ED Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांचा सक्रिय सहभागी असून वडिलांनी मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा आरोप सक्त अमंलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) (ED) वतीनं विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. 


अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ऋषिकेश यांनीही या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जाला ईडीनं एका प्रतिज्ञापत्राद्वारे विरोध केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ऋषिकेश यांचाही सक्रिय सहभाग आहे. मनी लॉन्ड्रिंगचा पैसा हा विविध कंपन्यांना दान म्हणून दाखविण्यात त्यांना देशमुख यांना मार्गदर्शन केलं आहे, असा गंभीर आरोप यामध्ये केलेला आहे. जर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला तर तो या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे प्रभावित करण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांना हा जामीन मंजूर करू नये, असं ईडीने यात म्हटलेलं आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून तब्बल अकरा कंपन्या चालविल्या जातात, असं प्राथमिक चौकशीमध्ये उघड झालेलं आहे. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये ऋषिकेश संचालक किंवा भागधारक आहे. या कंपन्यांचा व्यवहार संशयास्पद आहे, असा ईडीचा दावा आहे.


मात्र ईडी जाणीवपूर्वक आपल्याला या प्रकरणात अडकवत आहे. तसेच तपासयंत्रणेचा पूर्वग्रहदूषित पद्धतीने तपास सुरु आहे, असा दावा ऋषिकेश यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे. अर्जावर आता 4 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.


परमबीर सिंह भारतातच; 48 तासांत हजर होतील; वकिलाचा दावा


माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा आहे. परमबीर सिंह यांनी अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे. परमबीर सिंह हे भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दिली. परमबीर सिंह हे 48 तासांमध्ये हजर राहू शकतात अशीही माहिती त्यांच्या वकिलाने दिली. 


परमबीर सिंह हे भारतातच आहेत. हाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना जीवाचा धोका असल्याने ते समोर येत नाही असे त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात म्हटले. सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे निर्देश देत तपास, चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. 


परमबीर सिंह यांनी पदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्यांनाच तक्रारदार केले जात असल्याचे त्यांच्या वकिलाने म्हटले. परमबीर सिंह हे 48 तासांमध्ये कोणतेही सीबीआय अधिकारी अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :