Andheri East Bypoll Result 2022: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या (Andheri Bypoll Result) पोटनिवडणूक निकालात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विजयासोबत मतदान यंत्रावरील नोटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निकालात दुसऱ्या क्रमांकावर 'नोटा' पर्यायाला (NOTA) मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असल्याचे दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Uddhav Thackeray) मतदानापूर्वी नोटाला मतदान करण्याचे आव्हान विरोधकांकडून केले जात असल्याचा आरोप केला होता. या पोटनिवडणुकीत 'नोटा'ला 12 हजार 806 मते मिळाली.


अंधेरी पूर्वचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून या निवडणुकीसाठी जोर लावण्यात आला होता. तर, दुसरीकडे भाजपने या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अचानकपणे त्यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पटेल समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातही घोषणाबाजी केली होती. 


नोटाला मतदान करण्याचे आवाहन


मुरजी पटेल यांच्या माघारीनंतर नोटाला मतदान करण्याचे आवाहन करणारी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप पटेल समर्थकांची असल्याची चर्चा होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत नोटाला किती मते मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी होणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली होती. 


ठाकरे गटाचा आरोप


नोटांचा वापर करुन 'नोटा'ला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला होता.  यासंदर्भातील माहिती आणि पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. सोशल मीडियावरील विशेष करून आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्हिडीओ क्लिप आपण निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे सादर केल्याची माहिती परब यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.  


तिसऱ्या फेरीत नोटाला अधिक मते


मतमोजणीच्या पहिल्या दोन फेरीत लटके यांनी आघाडी घेतली होती. तर, नोटाला लक्षणीय मतदान झाले. मात्र, मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत चक्क नोटाला सर्वाधिक मतदान झाल्याचे समोर आले. ऋतुजा लटके यांना तिसऱ्या  फेरीअंती 11361 मते मिळाली आहेत. तर नोटा 2967 मते मिळाली. ऋतुजा लटकेंना दुसऱ्या फेरीच्या तुलनेत केवळ चार मते अधिक होती. तर, नोटाला तिसऱ्या फेरीत दुसऱ्या फेरीपेक्षा 1497 मते अधिक मिळाली. 


मतमोजणीच्या दहाव्या फेरीच्या अखेरीस ऋतुजा लटके यांना 37469 मते मिळाली. तर, 'नोटा'ला 7556 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बाळा नाडार या अपक्ष उमेदवाराला 975 मते मिळाली. दहाव्या फेरीपर्यंत 49616 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली होती. मतमोजणी संपली तेव्हा ऋतुजा लटके यांना 66 हजार 530 मते मिळाली. तर, नोटाला 12 हजार 806 मते मिळाली. 


ही भाजपची मते, ठाकरे गटाचा हल्लाबोल


उमेदवार मागे घेतला तरी नोटाला मतदान करण्यासाठी आवाहन करणारी पत्रके वाटली असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाने केली. खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, नोटा पर्यायाला मिळालेले मतदान हे भाजप-शिंदे गटाची विकृती दर्शवणारी आहे. नोटाला मतदान करण्याचे आवाहन करणारी विरोधकांची व्हिडिओ क्लिपिंग असतानाही निवडणूक आयोगाकडून कारवाई का झाली असा सवालही त्यांनी केला. सावंत यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. हा प्रकार लोकशाहीच्या मुळावर येणारा असल्याचे त्यांनी सांगितले.