Andheri East Bypoll Election: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या उमेदवारीचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत (BMC) लिपिक पदावर नोकरीस आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, मुंबई महापालिकेने अद्यापही हा राजीनामा मंजूर केला नाही. त्याविरोधात आता शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात आज सुनावणी होणार असून आजच निर्णय अपेक्षित आहे. 


शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि तात्पुरत्या स्वरुपात दोन गट स्थापन झाल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली. ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवण्यासाठी लिपिक पदाचा राजीनामा महापालिका अधिकाऱ्यांकडे सोपवला. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही. लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिकेवर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 


उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. बुधवारी शिवसेना ठाकरे गटाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. त्यावेळीही आयुक्तांनी थेट भाष्य करणे टाळले. त्यानंतर शिवसेनेने मुंबई हायकोर्टाने बुधवारी तात्काळ याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार असून आजच हायकोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे. 


ठाकरे गटाने आक्षेप, महापालिका आयुक्तांची माहिती


ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या तृतीय श्रेणातील कर्मचारी आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय संबंधित विभागाचे अधिकारी, सह-आयुक्त घेऊ शकतात. मात्र, आयुक्तांपर्यंत हे प्रकरण कसे गेले, असा सवाल ठाकरे गटाने केला. या प्रकरणात महापालिकेचे अधिकारी, आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोपही शिवसेना ठाकरे गटाने केला. 


तर, दुसरीकडे  ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 30 दिवसात ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: