मुंबई: अंधेरी पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तासच बाकी असतानाही दोन्ही बाजूचे उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाहीत. त्यामुळेच प्रश्न पडलाय की नेम कुणावर आहे आणि गेम कुणाचा होणार आहे?


ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप या तीन पक्षांच्या त्रिकोणामध्ये दोन उमेदवारांची उमेदवारी अजूनही टांगणीला लागलेली आहे. एकीकडे ऋतुजा लटके यांचा महापालिकेतल्या नोकरीचा राजीनामा मंजूर होत नसल्यानं घोडं अडलं आहे. तर दुसरीकडे भाजपने आपला उमेदवार नक्की कोण हेही घोषित केलेलं नाही. आता ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूरच झाला नाही तर शिवसेना काय करणार? 


उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनं तीन शिवसैनिकांना उमेदवारीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत त्यात उपविभागप्रमुख प्रमोद सावंत, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि विभाग संघटक कमलेश राय यांची नावे आहेत. पण प्रश्न असा आहे की या तिघांना तयार राहण्याचे आदेश देण्यामागेही काही गौडबंगाल आहे का?


दोनच दिवसांपूर्वी ऋतुजा लटके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे लटकेंना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली. त्यामुळेच ठाकरेंनी लटकेंचं तिकीट कापलं असा अर्थ काढला जाऊ लागला. पण अशी कोणतीही भेट झाली नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. पण ठाकरे गटाने मात्र लटकेंना शिंदे गटात खेचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. 


तिकडे भाजपमध्येही चलबिचल सुरु आहे कारण भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल यांनीही निवडणुकीचा अर्ज अजून भरलेला नाही. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं मुरजी पटेल यांचं नाव जवळपास निश्चितच केलंय. फक्त अधिकृष घोषणा बाकी आहे. मात्र शिंदे आणि ठाकरे यांच्यातील शह-काटशाहच्या राजकारणाला हवा देण्यासाठी भाजप ही जागा शिंदे गटाला सोडण्याची जास्त शक्यता आहे. या राजकारणात मुरजी पटेल यांचा बळी जाऊ द्यायचा नसेल तर शिंदे गटाकडून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. 


मी पक्षादेश पाळणार, निवडणूक लढवण्याची सूचना आली तर लढणार, नाहीतर पक्षादेश असेल तर माघार घेणार असं मुरजी पटेल एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. म्हणजे मुरजी पटेल यांची उमेदवारीही अजून निश्चित झालेली नाही हे स्पष्ट आहे. 


आता शिंदे गटाचे नेतेही आम्ही आमचा उमेदवार उभा करणार असा दावा करत आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मशाल विरुद्ध ढाल-तलवार असाच सामना होणार का? जनतेचा खरा कौल अंधेरीतच कळणार का? शिवसेना कुणाची? हे अंधेरीतच ठरणार का? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळण्याची शक्यता आहे.