Andheri By Election : पोटनिवडणुकांचा महाराष्ट्रातला आधीचा आणि आत्ताचा ट्रेंड यात फरक पडलाय. म्हणजे विद्यमान आमदाराचं आकस्मिक निधन झालं तर बहुतेकवेळा त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला इलेक्शन जवळपास बाय दिली जायची. आर.आर.पाटील, पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सुमनताई किंवा विश्वजीत कदम यांची निवडणूक बिनविरोध झाली होती. पण पंढरपुरात भारत भालके किंवा देगलूरमध्ये रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनानंतर अटीतटीच्या निवडणुका झाल्या. पंढरपुरात तर भालकेंच्या मुलाला भगीरथ भालकेंना सहानुभुतीचाही फायदा झाला नाही. म्हणजे प्रत्येकवेळी बाय देण्याचाही ट्रेंड राहिला नाही आणि प्रत्येकवेळी सहानुभुती कामाला येईल असंही नाही. त्यामुळेच इमोशन्सचा विचार आपण करुच पण त्यापुढे जाऊन जरा अंधेरीची नेमकी गणितं काय आहेत हेसुद्धा समजून घ्यावं लागेल..


आता पहिल्यांदा आकडेवारीवर नजर टाकूयात..


अंधेरी पूर्व मतदारसंघात 2 लाख 80 हजाराच्या आसपास मतदार आहेत. या मतदारसंघाला मिनी भारत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कुठल्याही एका वर्गाचा वरचष्मा या मतदारसंघात नाही. मिक्स पॉप्युलेशन आहे. कॉस्मो मतदारसंघ आहे. तसंच उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्ट्यांमध्ये  ही लोकसंख्या विभागलेली आहे.. त्यामुळे इथं निवडून यायचं असेल तर उमेदवाराचा कनेक्ट सगळ्या कम्युनिटीज आणि सगळ्या क्लाससोबत असावा लागतो..
 
आता शिवसेनेसाठी जी मराठी मतं जादू करु शकतात त्यांची संख्या 70 हजार आहे. त्यात नवबौद्ध समाजाचे 34-35 हजार मतदार आहेत.  मुस्लिम मतं जी यावेळी शिवसेनेला मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय ती 35 हजाराच्या आसपास आहेत. दक्षिण भारतीय मतदारही 20 हजाराच्या घरात आहेत. उत्तर भारतीय मतदार 55 हजाराच्या आसपास आहे.  37 हजाराच्या आसपास गुजराती मतं आहेत.  आणि 8 ते 10 हजाराच्या आसपास ख्रिश्चन मतदार आहेत.


त्यामुळे कुठल्याही एका समुदायाचा वरचष्मा तसा दिसत नाही. आता गेल्या तीन विधानसभा निवडणुकीचा इतिहास बघितला तर इथं मतदारही फार सजगपणे मतदान करतात असं नाही. आजवर इथं 50 ते 55 टक्क्यांच्या घरातच मतदान झालंय. म्हणजे 2009 ला 49 टक्के मतदान झालं होतं.  तर 2014 ला 53 टक्के मतदान झालं होतं. 


पण या मतदारसंघाचा इतिहास काय राहिलाय?


तर सत्तरीच्या दशकापासून 2009 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. म्हणजे सुरेश शेट्टी जे राज्याचे आरोग्यमंत्री होते, ते इथूनच निवडून आले होते.पण 2014 च्या नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर इथली गणितं बदलली. आता थोडं मायक्रो लेव्हलची गणितं काय आहेत ती बघूयात. अंधेरी पूर्वेत एकूण 8 वॉर्ड आहेत. त्यातल्या 4 वॉर्डात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेत.  तर 2 मध्ये काँग्रेस आणि 2 वॉर्डात भाजपचे नगरसेवक आहेत.
 
इथं रमेश लटकेंची एन्ट्री झाली तरी कशी?
रमेश लटके मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातले. पण ते जन्मले वाढले मुंबईतच. विशीत असल्यापासून ते शिवसेनेचं काम करत होते.. म्हणजे गटप्रमुख, शाखाप्रमुख, नगरसेवक अशा सगळ्या पातळ्यांवर त्यांनी शिवसेनेचं काम केलंय. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. 1997 ला ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडून गेले. मग 2002, 2007 आणि 2012 लाही त्यांनी पालिकेची निवडणूक जिंकली होती.. 2014 ला भाजप-सेनेची युती तुटली आणि शिवसेनेची लॉटरी लागली.. कारण 2009 लाही लटकेंनी विधानसभा गाठण्याचा प्रयत्न केला होता.. पण तेव्हा ते 5 हजार मतांनी पडले होते.  आणि मनसेच्या संदीप दळवींना तेव्हा 25 हजार मतं पडली होती.. म्हणजे मराठी मतं विभागली गेली आणि सुरेश शेट्टींचा विजय झाला. 2014 ला मात्र मनसेचा तेवढा प्रभाव उरला नाही.. मनसेला केवळ 9 हजार मतं मिळाली, भाजपच्या सुनील यादवांना  47 हजार आणि रमेश लटकेंना 52 हजार.. म्हणजे इथं जर मराठी मतांमध्ये नीट विभागणी झाली तर शिवसेनेची अडचण होते हे एकदा आधोरेखित झालंय. 


 मुरजी पटेलांची एन्ट्री
2019 ला शिवसेना-भाजपची विधानसभेसाठी पुन्हा युती झाली. आणि इथं मुरजी पटेलांची एन्ट्री झाली. ते अपक्ष उभे होते.. मुरजी पटेल अर्थात त्यांना काकाही म्हटलं जातं.. त्यांनी 45 हजार मतं घेतली. मुरजी पटेल यांचं कुटुंब मूळचं गुजरातच्या कच्छमधलं ते बऱ्याच वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहेत.. जीवनज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अंधेरीत कामाला सुरुवात केली.. मुरजी पटेलांचाही जनसंपर्क दांडगा आहे. मराठीसह गुजराती आणि उत्तर भारतीयांशी ते नीट कनेक्टेड आहेत. खरंतर पटेल मूळ काँग्रेसी.  2012 ला त्यांच्या पत्नी केशरबेन काँग्रेसच्या तिकीटावर महापालिकेवर निवडून गेल्या. मग 2015 च्या आसपास म्हणजे मोदी लाटेत काँग्रेसचा सुफडा साफ झाल्यावर त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचा जनसंपर्क, काम करण्याची तडफ बघून भाजपनं त्यांची पत्नी केशरबेन आणि मुरजी पटेल यांना 2017 मध्ये पालिकेची उमेदवारी दिली. दोघंही निवडणूक जिंकले, पण बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपात त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं.


 इथं जिंकण्याचा चान्स जास्त कुणाला आहे?


रमेश लटके यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यातच रमेश लटके यांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दल मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांमध्ये एक सहानुभुती आहे. दुसरीकडे रमेश लटके यांच्या पत्नीला निवडणूक लढण्याची इच्छा होती, मात्र मुंबई महापालिकेकडून त्यांचा राजीनामा आधी तांत्रिक मुद्दे काढून स्वीकारला गेला नाही. त्यांना आपल्या उमेदवारीसाठी थेट हायकोर्टाच्या दरवाज्यात जावं लागलं या मुद्द्यामुळे एक परसेप्शन झालं की लटके आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या मार्गात अडथळे क्रिएट केले जातायत. त्यामुळे लटकेंबद्दल स्वाभाविक सिंपथी बघायला मिळतेय. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि चिन्हं शिंदे गटामुळे गोठवलं गेल्याचं नॅरेटिव्ह मांडायला सुरुवात केलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे गटामध्ये एक संताप आहे, त्याचं रिव्हेंज व्होटिंग जे आहे ते या निवडणुकीमध्ये बघायला मिळू शकेल.  तिसरीकडे काँग्रेस इथं आपला उमेदवार देणार नाहीए. त्यामुळे काँग्रेसला गेल्या तीन निवडणुकीत मिळालेली सरासरी मतं बघितली तर तोही फायदा ऋतुजा लटकेंना होऊ शकेल.
 
मुरजी पटेलांनी गेल्यावेळी कमळाचं चिन्ह नसताना 45 हजार मतं घेतली होती. त्यांचा मतदारसंघातील कनेक्ट विसरता येणार नाही. शिवाय उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांचा आकडा लक्षात घेतला तर तो 50 हजाराच्या घरात आहे. शिवाय शिंदे आणि फडणवीस या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे स्वाभाविक भाजपचं सगळं केडर जीव लावून या निवडणुकीत उतरेल. शिवाय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन कसं हिंदुत्व सोडलं.  या मुद्द्यापासून ते हिंदू सणांसाठी आम्ही किती संवेदनशील आहोत इथपर्यंत सगळे मुद्दे निवडणुकीत असतील. शिवाय मनसे आणि समाजवादी पक्ष किंवा एमआयएमनं जर या निवडणुकीत उडी घेतली तर मराठी आणि मुस्लिम मतांमध्ये विभागणी होईल.  ज्याचा फटका लटकेंना बसू शकतो..


आकड्यांचा खेळ महत्त्वाचा असणार


आता आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, तो हा की 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या मतांचं मार्जिन 5 हजाराच्या आत-बाहेर आहे. केवळ 2019 च्या निवडणुकीतच हे मार्जिन 16 हजाराच्या घरात गेलं होतं. त्यामुळे निवडणूक केवळ इमोशन्सवर किंवा भावनांच्या हिंदोळ्यावर जाईल असं नाही, तर आकड्यांचा खेळ हा महत्त्वाचा असणार आहे. सगळ्या कम्युनिटीच्या मतदारापर्यंत आपले मुद्दे आणि भूमिका नीटपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं प्रचार करावा लागेल. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे. कारण शिंदे गट फुटल्यानंतर आणि हिंदुत्ववादी सरकार स्थापन केल्याचा दावा शिंदे-फडणवीसांनी केल्यानंतर लोकांची नेमकी मानसिकता नेमकी काय आहे? लोक काय विचार करतायत? आणि महापालिकेला काय पॅटर्न असेल हे दर्शवणारी ही निवडणूक असणार आहे.