Andheri East By Election 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या (Andheri East By Election) रिक्त जागेसाठी पुढील महिन्याच्या 3 तारखेला पोटनिवडणूक (Bypoll) होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजप-शिंदे गट निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसनं (Congress) पाठिंबा जाहीर केला आहे. तर, शिंदे गटाच्या पाठिशी भाजप (BJP) असल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे आणि भाजप-शिंदे गटाची नसून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध एनडीए (NDA) यांच्यात असल्याचं बोललं जात आहे. आता या निवडणुकीत गुलाल कुणाचा असणार यासाठी 6 नोव्हेंबरची वाट पाहावी लागेल.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळाल्या. उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व अमान्य करत पक्षाविरोधात बंड पुकारलेल्या बंडखोर आमदारांनी पक्षाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर दावा करण्यास सुरुवात केली. सर्वात आधी पक्षाचं गटनेतेपद, त्यानंतर पक्ष, पक्षाचं चिन्ह एकापाठोपाठ सर्वच गोष्टींवर दावा करत शिंदे गटानं ठाकरेंची पुरती कोंडी करण्यास सुरुवात केली. पक्षाचं नाव आणि चिन्ह याचा फैसला निवडणूक आयोगाच्या अंगणात पोहोचला आणि निवडणूक आयोगानं दोन्ही गटांकडून दावा होत असलेलं 'शिवसेना' हे पक्षाचं नाव वापरणाऱ्यावर बंदी घातली. एवढंच नाहीतर निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह असलेलं 'धनुष्यबाण' गोठवलं. आता निवडणूक आयोगानं उद्धव गटाला निवडणूक चिन्ह, 'मशाल' आणि शिंदे गटाला 'ढाल-तलवार' हे चिन्ह दिलं.
मुंबई अंधेरी पूर्व ही जागा शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानं रिक्त झाली होती. अंधेरी पूर्व जागेसाठी भाजपकडून मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी-काँग्रेस ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा देत आहेत. त्याचवेळी भाजपकडून मुरजी पटेल यांनी आपला अर्ज भरला असून शिंदे गट पूर्ण ताकतीने त्यांच्या मागे आहे.
मतदारसंघात मराठी आणि उत्तर भारतीयांची संख्या मोठी
अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळालेले मुरजी पटेल हे गुजराती भाषिक आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या गटातून निवडणूक लढवणाऱ्या ऋतुजा लटके या मराठी आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश लटके यांनी विजय मिळवला होता. या मतदार संघाबाबत बोलायचं झालं तर या ठिकाणी हिंदी भाषिक आणि मराठी मतदार सर्वाधिक आहेत. हेच मतदार पोटनिवडणुकीत उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत.
फक्त अंधेरीच्या नागरदास रोडच्या लीजवर बहुतांश गुजराती मतदार आहेत, तर उर्वरित संपूर्ण मतदारसंघ हा उत्तर भारतीय आणि मराठी लोकांचा बालेकिल्ला मानला जातो. अशा स्थितीत अंधेरीच्या जागेवर गुजराती विरुद्ध मराठी अशी लढत झाल्यास भाजपसाठी ही लढत फारशी फायदेशीर नसण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्वमधून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश लटके आमदार म्हणून निवडून आले होते. याचं एक कारण म्हणजे, ते तीन वेळा स्थानिक नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि त्यांच्या भागात त्यांचा चांगलाच जनसंपर्क होता. याशिवाय दुसरं मोठं कारण म्हणजे, मराठी मतदारांनी संघटित होऊन त्यांच्या बाजूनं मतदान करणं. त्यामुळेच पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना रिंगणात उतरवून सहानुभूती मिळवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे.
2014 मध्ये भाजपनं मराठी मतांचं राजकीय समीकरण तोडण्याचा मोठा प्रयत्न केला होता. धोरणात्मकदृष्ट्या त्यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघातून आपले उत्तर भारतीय उमेदवार सुनील यादव यांना उभं केलं होतं. परंतु 2014 ची मोदी लाट असूनही शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके विजयी झाले. 2019 मध्ये भाजप-शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली होती. तेव्हा मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. अशातच रमेश लटके पुन्हा आमदार झाले. यावेळी भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवले आहे.
अंधेरीच्या जागेवर मराठी मतांसह यूपी, बिहार, झारखंड, मुस्लिम, गुजराती, मारवाडी, जैन, दक्षिण भारतीय, ख्रिश्चन आणि पंजाबी मतदार मोठ्या संख्येनं आहेत. याशिवाय पारशी मतदारही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहेत. या जागेवर मराठी आणि उत्तर भारतीय मतदार सर्वाधिक आहेत. भाजपने गुजराती भाषिक उमेदवार मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवलं आहे, तर उद्धव यांनी मराठी उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
काँग्रेसचा चांगला जनाधार
पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रमेश लटके हयात नाहीत आणि भाजपचे सुनील यादवही नाहीत. याचा फटका शिवसेना आणि भाजप या दोघांनाही सहन करावा लागणार आहे. विशेषत: भाजपसाठी चिंतेची बाब म्हणजे, यावेळी उद्धव गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा पाठिंबा आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात काँग्रेसचा चांगला जनाधार आहे. कारण 2014 मध्ये काँग्रेसला 37 हजार आणि 2019 मध्ये 27 हजारांहून अधिक मतं मिळाली होती. काँग्रेसच्या या मतांचा फायदा यावेळी ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळू शकतो.
उत्तर भारतीय किंगमेकर?
तर गुजराती भाषिक असलेल्या मुरजी पटेल यांना उत्तर भारतीय मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण मुरजी पटेल यांनी ही निवडणूक जिंकली तर या जागेवरून उत्तर भारतीयांचा दावा कायमचाच संपुष्टात येईल, असं उत्तर भारतीय नेत्यांनाही वाटत आहे. अशा स्थितीत पटेलांना उत्तर भारतीयांची किती मते मिळतात याकडे सर्वांच्या नजरा असतील. पारंपारिकपणे मराठीबहुल असलेल्या या जागेवर गुजराती विरुद्ध मराठी यांच्यातील लढत असून उत्तर भारतीय किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. अशा परिस्थितीत अंधेरी पूर्वेतील राजकीय लढाईत कोण बाजी मारणार, गुलाल कुणाचा उधळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.