मुंबई: अंधेरीतील कोसळलेल्या गोखले पुलाचा भाग किंवा हा पूल रेल्वेचा आहे. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही रेल्वेची आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.


"देखभालीसाठी बीएमसी रेल्वेला मागणीनुसार पैसेही देते. रेल्वेने जबाबदारी टाळू नये. आम्ही जबाबदारी कधीच झटकत नाही. पूलाची जबाबदारी बीएमसीची आहे हे सांगत रेल्वे प्रशासन दिशाभूल करतेय", असा आरोप महापौरांनी केला.

एलफिन्स्टन ब्रिज दुर्घटनेनंतर चर्चगेट ते विरारपर्यंतचे सर्व पूल चांगले असल्याचे सांगणारा रेल्वेचा अहवाल खोटा आहे का ? हा खोटा अहवाल बनवला गेला तर जबाबदारी कुणाची?, असा सवाल महाडेश्वर यांनी केला.

तसंच खासदार किरीट सोमय्या म्हणतात हा ब्रिज MMRDA आणि महापालिकेचा आहे. मात्र सोमय्या काय बोलतात, याबद्दल मी बोलणं योग्य नाही. मुंबईकरांना माहित आहे ते कशी वक्तव्य करतात ते, असं महापौर महाडेश्वर म्हणाले.

अंधेरीत पुलाचा भाग कोसळला

मुंबईत कालपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फुटपाथचा भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे  पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.   फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. त्या ब्रिजवरील फुटपाथचा काही भाग कोसळला. हा पूल 1960-70 चा असल्याने खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.  ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.

ब्रिज कोसळल्याने जीवितहानी झालेली नाही. 5 जण जखमी झालेले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे वाहतूक सुरु करणं हे मोठं आव्हान आहे.

संबंधित बातम्या 

अंधेरीत ब्रिजचा फूटपाथ कोसळला, पाच जण जखमी  

अंधेरी पूल दुर्घटना : आतापर्यंत काय-काय घडलं?  

अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमनचा इमर्जन्सी ब्रेक, अनेक प्रवाशांचे प्राण वाचले 

अंधेरी स्टेशनवर पुलाचा भाग कोसळला, रेल्वे वाहतूक ठप्प