मुंबई: तमाम महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत असलेल्या गणपती बाप्पााच्या निरोपाची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांचा 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका गणपती बाप्पा मंगळवारी अनंत चतुदर्शीच्या (Anant chaturdashi 2024) दिवशी विसर्जनासाठी निघणार आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी मुंबईतील प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची मिरवणूक निघेल. त्यासाठी आतापासूनच सार्वजनिक मंडळांनी तयारी सुरु केली आहे.
मुंबईत लालबागच्या राजाच्या पाठोपाठ गणेश गल्लीचा गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी (chinchpokli cha Chintamani) हे गणपती भाविकांच्या आकर्षणाचा विषय असतात. या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत भाविकांची धडपड सुरु असते. मात्र, उद्या मिरवणूक असल्याने लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग आता बंद केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांकडे या गणपतींचे मंडपात जाऊन दर्शन घेण्यासाठी अवघ्या काही तासांची मुदत उरली आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणीची विसर्जन मिरवणूकीची तयारी करावयाची असल्याने सोमवारी सायंकाळी 6 वाजता चरणस्पर्श दर्शन बंद करण्यात येईल. तर रात्री ठीक 12 वाजता मुखदर्शन बंद करण्यात येईल. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी.व सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
अजित पवार शेवटच्या क्षणी लालबागमध्ये गणपतीच्या दर्शनाला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांना मंडळाचे उप मानदसचिव प्रविण राणे यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
लालबागचा राजाची दर्शनाची रांग कधी बंद होणार?
लालबागच्या राजाच्या (Lalbaug Cha Raja) विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व तयारीसाठी दर्शनाची रांग सोमवारी रात्री बंद करण्यात येणार आहे. चरण स्पर्शाची रांग सोमवारीपहाटे 6 वाजता बंद करण्यात आली. तर मुखदर्शनाची रांग सोमवारी रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने मुंबई पोलिसांची महत्त्वाची सूचना
मुंबई पोलिसांनी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. जुन्या तशाच धोकादायक पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक निघताना काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जुन्या तशाच धोकादायक पुलावरून १०० पेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरवणूकी वेळी जाणार नाहीत, पुलावर ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात येवू नये तसेच नाचू नये, असेही पोलिसांकडून बजावण्यात आले आहे.
आणखी वाचा
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी