मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मनसेच्या नेत्यांच्या बैठकीत अमित ठाकरेंना राजकारणात आणण्याची मागणी करण्यात आली आहे.


आज मनसेच्या नेत्यांच्या आणि सरचिटणीसांच्या बैठकीत बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेनी अमित ठाकरेंना राजकारणात आणण्याची मागणी केली. तसंच मराठीच्या मुद्यावर सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

आपल्यातच मराठीचा मुद्दा रूजलाय का असा सवालही बाळा नांदगावकरांनी विचारला आहे. तसंच नाशिकमधील कामांचं आपण मार्केटिंग करु शकलो नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या आदेशाची वाट न पाहता पक्षासाठी काम करण्याबद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली.

मनसेची नवी स्ट्रॅटेजी बनवून पुन्हा कमबॅक करण्यावरही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

अमित ठाकरे राजकारणापासून अलिप्त

अमित ठाकरे तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते फार सक्रीय नाहीत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता. अमित ठाकरेंनी मुंबईतील पोद्दार कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

अमित ठाकरे मध्यरात्री 2 वाजता विश्वजित ढोलमांच्या भेटीला

मनसेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांनी नोव्हेंबरमध्ये मारहाण केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ढोलम यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे रुग्णालयात गेले होते.

26 नोव्हेंबरला विक्रोळीतील मनसेचे उपविभागप्रमुख विश्वजित ढोलम फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झाले. त्यानंतर त्यांना महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी ढोलम यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अमित ठाकरे मध्यरात्री 2 वाजता महात्मा फुले रुग्णालयात दाखल झाले.

अमित ठाकरेंचा साखरपुडा, मात्र उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला.