ठाणे : डायलिसीस करताना ऑक्सिजन सिलिंडरमधला ऑक्सिजनच संपल्यामुळे रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेच्या कोपरीतील रुग्णालयात आज सकाळच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला.


ठाणे पूर्वेच्या कोपरी परिसरात राहणारे नरेंद्र वझीरानी हे 61 वर्षीय रुग्ण आज सकाळी चालत कोपरीतील महापालिका रुग्णालयात नियमित डायलिसीस करण्यासाठी आले होते. त्यांच्या पत्नी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांना डायलिसीससाठी सोडून गेल्या. डायलिसीस करताना वझीरानी यांना ऑक्सिजन लावण्यात आला. मात्र काही वेळानं सिलेंडरमधला ऑक्सिजन संपला. ही बाब सुरुवातीला कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र वझीरानी हे तडफडू लागताच वॉर्ड बॉय दुसरं सिलेंडर आणण्यासाठी गेला. पण सिलेंडर घेऊन येईपर्यंत वझीरानी यांचा मृत्यू झाला होता.

वझीरानी यांचा मृत्यू झाल्याचं कळताच हॉस्पिटलच्या स्टाफने त्यांच्या नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतलं आणि वझिरानी हे सिरीयस होऊन बेशुद्ध पडल्याचं सांगत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांना दुसऱ्या मजल्यावरून खाली नेण्यासाठी तिथे ना स्ट्रेचर उपलब्ध होता, ना रुग्णवाहिका. त्यामुळं अखेर वझीरानी यांना हातात उचलून खाली आणत रिक्षेनं जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या सगळ्या प्रकाराला हॉस्पिटलचे डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप वझीरानी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ठाणे महापालिकेच्या हॉस्पिटलचा हा डायलिसिस विभाग एका खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आला आहे. तिथे 24 तास एक मुख्य डॉक्टर आणि एक ज्युनिअर डॉक्टर असणं गरजेचं आहे. मात्र ज्यावेळी हा प्रकार घडला, त्यावेळी तिथे मुख्य डॉक्टर उपस्थित नव्हते. कारण मुख्य डॉक्टर गेल्या आठ दिवसांपासून रजेवर असल्याचं उपस्थित डॉक्टरांनी सांगितलं.

रुग्णांना चांगली सेवा देणं आणि त्यांचा जीव वाचवणं हे कुठल्याही डॉक्टरचं काम असतं. मात्र ठाणे महापालिकेच्या या कोपरी रुग्णालयात मुख्य डॉक्टरच जबाबदारी सोडून आठ आठ दिवस सुट्टीवर जात असेल, आणि त्याच्या अनुपस्थितीत अशाप्रकारे चालत्या फिरत्या रुग्णांचे हकनाक बळी जाणार असतील, तर याची दखल घेऊन ठाणे महापालिका आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करणं गरजेचं आहे.