मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र त्याआधी शाह यांनी मध्यावधीसंदर्भात स्ट्राँग मेसेज दिला आहे.
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्या तर आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि युतीतला वाढता तणाव यासंदर्भात आज शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. अशावेळी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अलिकडेच मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे, असं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर अमित शहांचं हे वक्तव्य महत्वाचं आहे.