ठाणे : ठाणे महापालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आज ज्युपिटर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 30 ऑगस्ट रोजी एका फेरीवल्याने त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. ज्यामध्ये त्यांची 3 बोटे तुटली होती तर डोक्यावर गंभीर दुखापत त्यांना झाली होती. मात्र 2 वेळा शस्त्रक्रिया करून देखील त्यांना 2 बोटे कायमची गमवावी लागली आहेत. तर एक बोट पुन्हा हाताला जोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे. पूर्ण बरी झाल्यानंतर त्याच जोमाने आणि अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करणार असे हॉस्पिटलमधून घरी जाताना कल्पिता पिंपळे यांनी सांगितले आहे.


मागील महिन्यात कासारवडवली येथे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना अमरजित यादव या फेरीवल्याने रागाच्या भरात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. हा हल्ला इतका जीवघेणा होता की यात त्यांच्या डाव्या हाताची 3 बोटे छाटली गेली तर डोक्यावर देखील वार झाल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, एक बोट पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आले. दुसरे एक बोट जोडले होते. मात्र, शरीराने त्याला पुन्हा स्वीकारले नाही, त्यामुळे त्यात गँगरीन झाले. अखेर पुन्हा शस्त्रक्रिया करून निकामी बोट देखील काढण्यात आले. आज त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले. 


हॉस्पिटलमधून घरी जाताना त्यांनी बरी झाल्यावर पुन्हा जोमाने कारवाई सुरू करणार असल्याचे सांगितले. "मी एयर फोर्समधल्या भावाची बहीण आहे, त्यामुळे थांबणार नाही, त्यांना मी घाबरत नाही", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, सर्व नगरसेवक, सर्व डॉक्टर, भेटायला आलेले राजकारणी यांना त्यांनी धन्यवाद दिले. दरम्यान अमरजित यादव या आरोपी फेरीवाल्यावर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे अशी कलमे लावून अटक केली होती. सध्या त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सूनवल्याने तो तुरुंगात आहे.