अंबरनाथ  : आशिया खंडातली सर्वात मोठी एमआयडीसी अशी ओळख असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीत कामगार तुटवड्यामुळे सध्या प्रचंड नुकसान होतं आहे. परप्रांतीय कामगार गावी परतल्यानं एमआयडीसीत ही परिस्थिती ओढावली आहे.


अंबरनाथ एमआयडीसीत 1 हजार पेक्षा जास्त कंपन्या असून तिथे जवळपास 25 हजार परप्रांतीय कामगार काम करतात. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कामगार गावी परतले असून त्यामुळे अकुशल कामगारांचा मोठा तुटवडा एमआयडीसीत निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. शिवाय निर्यातही बंद आहे. त्यामुळे अंबरनाथ एमआयडीसीला महिन्याला तब्बल 2100 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती कारखानदारांची संघटना असलेल्या अॅडीशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आमा) अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली आहे.


दुसरीकडे मनसेनं हा तुटवडा भरून काढण्यासाठी मराठी कामगारांना संधी द्यावी, अशी मागणी आमा संघटनेकडे केली आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी एमआयडीसीत काम करण्याची इच्छा असलेल्या मराठी बेरोजगार तरुणांची यादी आमा संघटनेला दिली असून यापुढे पळून जाणाऱ्या परप्रांतियांऐवजी स्थानिकांना कंपन्यांनी काम देण्याची मागणी मनसेने केली आहे.


कोरोना लॉकडाऊनमुळं एकीकडे रोजगार गेला असल्याचं समोर आलं असलं तरी दुसरीकडे परप्रांतिय कामगार गावी गेल्याने रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत. परप्रांतिय कामगाराच्या जागी महाराष्ट्रातील कामगारांना काम देण्याची मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे.