एपीएमसी मार्केट मध्ये हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 03 Mar 2017 07:09 PM (IST)
नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या पेट्या मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागल्या आहेत. सध्या दररोज 10 हजार पेट्यांची आवक एपीएमसी मार्केटमध्ये होत आहे. मात्र कोकणाबरोबर गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यातील आंब्याचीही आवक वाढल्यानं खवय्यांना आंबे स्वस्तात मिळणार आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक होते. देशातील सर्वात मोठे मार्केट असलेल्या वाशीच्या एपीएमसीमध्ये कोकणाबरोबरच शेजारील राज्यातूनही आंबा दाखल झाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून तुरळक प्रमाणात कोकणातून हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल होण्यास सुरवात झाली होती. मात्र आता दिवसाला 10 हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक एपीएमसीमध्ये होत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधूनही आवक होत आहे. घाऊक बाजारात 1500 ते 4000 रुपयांपर्यंत 4 डझनाची पेटी विकली जात आहे. कोकणातील हापूससोबतच तोतापुरी, बदामी, लालबाग, गोळा जातीचे आंबे एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. हे आंबे 100 ते 150 रुपये किलोनं विकले जात आहेत.