मुंबई : मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक व्यवसायांना सुरु करण्यासाठी परवानगी दिली. परंतु व्यावसायिकांनी सम-विषय तारखेच्या नियमाला विरोध केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. याचा फटका म्हणजे अनेक व्यवसाय पूर्णपणे थंड आहे. त्यातच तीन दिवसच दुकानं सुरु ठेवण्यामुळे काहीच व्यवसाय होत नाही. यावर उपाय म्हणून आम्हाला सहा दिवस व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे.
मिशन बिगीन अगेनअंतर्गत सलून व्यवसाय, बाजार, देशांतर्गत विमानसेवा सुरु झाली. यासोबतच वेगवेगळी दुकानंही सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. या व्यवसायिकांना सम आणि विषम तारखेच्या नियमाचा निर्बंध घालण्यात आला होता. आता अनेक व्यवसायिकांनी मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या या नियमाचा विरोध केला आहे. यामध्ये झवेरी बाजारातील सोने चांदीचे व्यापारी, तसेच मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. या संघटनेचे महाराष्ट्रात तब्बल साडेतीन लाख सदस्य आहेत.
सध्या मुंबईत कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. याचा फटका म्हणजे सध्या अनेक व्यवसाय पूर्णपणे थंड असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच तीन दिवसच दुकानं सुरु ठेवण्यामुळे काहीच व्यवसाय होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यावर उपाय म्हणून आम्हाला सहा दिवस व्यवसाय सुरु ठेवण्याची मागणी सर्व व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जरी वाढत असला तरीही दुसरीकडे विचार केला तर महाराष्ट्राला आणि देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी व्यवसाय सुरु करणं गरजेचं असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
याबाबत बोलताना, मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा म्हणाले की, "महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य देशातील सर्वात जास्त टॅक्स भरणारे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य वर्षाला तब्बल 65 टक्के जीएसटी केंद्राला देत आहे. त्यामुळे मुंबई, किंबहुना देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी मुंबईतील व्यवसाय सुरु होणं गरजेचं आहे. सध्या मुंबईत सम आणि विषम तारखेचा निर्णय लागू करण्यात आला आहे. परंतु अडचण अशी आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे दुकानात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यात सम-विषमच्या नियमामुळे केवळ तीन दिवसच दुकानं सुरु असतात. यामुळे कामगारांना पगार देता येईल, इतकी देखील रक्कम जमा होतं नाही. मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी व्यवसाय सहा दिवस सुरु करण्याची परवानगी द्यावी. या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रव्यवहार केला आहे. अपेक्षा आहे लवकरच आमची मागणी मान्य होईल."
तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, "सध्या आम्ही तीन दिवसांचा नियम लागू केला आहे. जर सम विषमचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याचं लक्षात आलं तर आम्ही लवकरच सात दिवस दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी देऊ. सध्या आमची याबाबत चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ."
Mission Begin Again | मुंबईतील दुकानं सहा दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्या : व्यापारी