BJP Leader Ashish Shelar : भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर आज त्यांनी आपला जबाब नोंदवला. यावेळी भाजप नेतेही उपस्थित होते. कागदी वाघांना आम्ही घाबरणार नसल्याचे म्हणत ही राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. 


आज सकाळपासून आशिष शेलार यांच्या घराबाहेर समर्थक, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,  मुंबई भाजपातील नेते अतुल भातखळकर, मंगल प्रभात लोढा आदी शेलार यांच्यासह उपस्थित होते. शेलार यांनी जबाब नोंदवल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर टीका केली. 


भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले की, भाजप अशा लोकांना घाबरणार नाही. राज्य सरकार एवढे संवेदनशील आहे तर मग पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल का नाही? महबूब शेख प्रकरणात बलात्काराचा आरोप झाला आजपर्यंत कारवाई का झाली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भातखळकर यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. मी केलेल्या एका ट्वीटवरून संजय राऊत बिथरले असून त्यांनी भाजप आणि पक्षातील महिलांचा अपमान केला असल्याचे भातखळकर यांनी म्हटले. संजय राऊत यांनी जी असभ्य भाषा वापरली त्यामुळे कोणाच्या डोक्यात कचरा आहे हे स्पष्ट झाले असल्याचे ही त्यांनी म्हटले. वरळी सिलेंडर स्फोटात झालेल्या मृत्यूंवरील लक्ष हटवण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप भाजप नेते आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केला. 


सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात अजून कडवा संघर्ष करणार


अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात  कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की , मग सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर कसा केला जातो, हे गेली दोन वर्षे जनता पाहते आहेच. मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडणार असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले. ज्या पत्रकार परिषदेवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ आजही युट्युबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य, जे सत्ताधारी पक्षाला बघायचे नसले तरी ते न्यायालयासमोर आम्ही मांडू. माझा न्याय व्यवसस्थेवर विश्वास आहे. सत्य समोर येईलच असेही त्यांनी म्हटले.