मुंबई: रेल्वे अनेक जुने कोच असेच पडून असतात. या जुन्या कोचला नवीन रुपडं देत सीएसएमटी स्टेशन (CSMT Station) वर नुकतंच ‘रेस्टॉरेंट ऑन व्हील्स’ (Restaurant on Wheels) सुरु केलं आहे. या रेस्टॉरेंटला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. यामुळं आता  मध्य रेल्वे (Central Railway) नं अन्य काही स्थानकांवर देखील हा प्रयोग करायचं ठरवलं आहे. 


मुंबई सीएसएमटीवर ट्रेनच्या कोचमध्ये सुरु केलेल्या रेस्टॉरेंटमध्ये (Restaurant) 10 टेबलची व्यवस्था केलेली आहे. या रेस्टॉरेंटला चांगलीच पसंती मिळत आहे. आता यामुळं मध्य रेल्वे मुंबई विभागासह महाराष्ट्रातील 11 रेल्वे स्थानकांवर असा प्रयोग करणार आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार यासाठीचं टेंडर देखील जारी करण्यात आलं आहे. 


नागपूरमध्ये काम सुरु
नागपूरमध्ये अशा प्रकारचा रेस्टॉरेंट कोच बनवण्याचं काम सुरु देखील करण्यात आलं आहे. यासाठी ट्रेन कोच संबंधित जागेवर लावण्यात देखील आला आहे. आता सीएसएमटीनंतर  रेस्टॉरेंट ऑन व्हील्स मुंबईतील एलटीटी, कल्याणसह इगतपुरी, लोणावळा आणि नेरुळमध्ये सुरु होणार आहे. मुंबईसोबत नागपूर, आकुर्लीसह अन्य सहा स्थानकांवरही हे रेस्टॉरेंट सुरु होणार आहेत. 


CSMT स्थानकातील 'मील ऑन व्हील' रेस्टॉरंटची खासियत
हॉटेल सीएसएमटी स्थानकाच्या 18 नंबर प्लॅटफॉर्म समोर सुरू करण्यात आलं असून येथे बाजूलाच भारतीय रेल्वेचा इतिहास सांगणारे अनेक जुने इंजिन, जुने डबे आणि वेगवेगळ्या जुन्या मशीन ठेवण्यात आल्या आहेत.पी डिमेलो रोडच्या बाजूलाच हे हॉटेल असल्याने येण्या जाण्यास देखील सोयीस्कर आहे. तसेच या हॉटेलमध्ये जाण्यासाठी रेल्वेची टिकीट असणे किंवा प्लॅटफॉर्म तिकीट असणे बंधनकारक नाही. त्यामुळे आपल्या रेल्वेची वाट बघत असलेल्या प्रवाशांसोबत बाहेरील नागरिक देखील या हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. एकूण चाळीस ग्राहकांची आसन क्षमता या हॉटेलमध्ये आहे. रेल्वेच्या डब्यात सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये दोन विभाग आहेत. एका विभागात आपण बसून ऑर्डर देऊन जेऊ शकतो, तर दुसरीकडे उभ्याउभ्या वडापाव, सॅंडविच, ज्यूस, सॉफ्टड्रिंक असे पदार्थ खाऊ शकतो. अशा प्रकारचे रेल्वे डब्यात सुरु झालेले हॉटेल आसनसोल स्थानकात आहे. त्याच धर्तीवर मध्य रल्वेच्या सीएसएमटी स्थानकात दुसरे हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. या हॉटेलमध्ये आपल्याला वडापाव पासून ते पंजाबी, चायनीज आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. हॉटेलच्या बाजुला रेल्वे स्थानकातच मोकळी जागा असल्याने पार्किंगची समस्या देखील नाही. विकेंडला या रेस्टॉरेंटमध्ये सरासरी 400 ग्राहक तर अन्य दिवशी 250 ते 300 ग्राहक भेट देत असल्याची माहिती आहे. यामुळं चांगला महसूल देखील मिळत आहे.


संबंधित बातम्या


Photo : CSMT स्थानकात 'मील ऑन व्हील' रेस्टॉरंट सुरु