मुंबई :  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आज ठाण्यातील टेंभी नाक्यावरील नवरात्रौत्सवात सहभागी होण्यासाठी गेल्या असताना दुसरीकडे रश्मी ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळी (Meena Kambli) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मीनाताई कांबळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दोन गंभीर आरोप केले आहेत. 


मीनाताई कांबळी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. शिवसेनेत मागील वर्षी फूट पडल्यानंतरही मीनाताई कांबळी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मीनाताई कांबळी यांच्यावर नाराज असलेल्या काहींनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. मीनाताई कांबळी या शिवसेनेत मागील 45 वर्षांपासून कार्यरत होत्या. 


मीनाताई कांबळी या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीय होत्या. त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. एबीपी माझा सोबत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.


उद्धव यांच्यावर दोन गंभीर आरोप, त्यांनी तर माझ्या...


एबीपी माझासोबत बोलताना शिंदे गटाच्या नेत्या मीनाताई कांबळी यांनी दोन गौप्यस्फोट केले आहेत. आपल्या वेदना सांगताना त्या कमालीच्या भावूक झाल्यात. मीनाताई कांबळी यांनी सांगितले की, मला 2012 साली विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. मला मातोश्रीवरून फोन आला होता. त्यावेळी अनिल देसाई घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची तयारी केली. रात्री उशिरापर्यंत ते सोबत होते. दुसऱ्या दिवशी विधान भवनात बोलवले होते. दुपारपर्यंत विधान भवनात होते. मात्र, ऐनवेळी तोंडातला घास उद्धव ठाकरेंनी काढला. बाहेरुन आलेल्यांना विधान परिषद, राज्यसभेची खासदारकी दिली. मात्र, आम्ही आयुष्य शिवसेनेसाठी देऊनही आम्हाला काहीच मिळाले नाही.


दुसरा आरोप करताना मीनाताई कांबळी यांनी आपल्या दिवंगत भाच्याचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की,  माझा भाचा, आशिष साखरकर  हा 'भारत श्री' होता. त्याला सरकारी नोकरी मिळणं अपेक्षित होतं. शासकीय नियमात नोकरी मिळणे अपेक्षित होते. मात्र, पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही त्याला नोकरी मिळाली नाही. दुर्देवाने त्याचे आता निधन झाले असल्याचे कांबळी यांनी सांगितले. 


शिंदे गटाला फायदा होणार?


मीनाताई कांबळी या दक्षिण मुंबईत अधिक सक्रिय आहेत. मराठीबहुल भागातील शिवसेना ठाकरे गटाच्या मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी  मीनाताई कांबळी यांची मदत होईल, असा होरा शिंदे गटाचा आहे. मीनाताई कांबळी यांनी 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.