मुंबई : मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी सुरु असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेत मॉकड्रीलचं कारण देत सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते इथे आल्यास कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून महापालिकेचे सर्व दरवाजे बंद करण्यात आल्याचीही सध्या चर्चा सुरु आहे.
महापालिकेतील दरवाजे बंद केल्यानंतर तिथं अग्निशमन दलाचे जवान आणि गाड्याही दाखल झाल्या आहेत. मात्र, हा नेमका काय प्रकार सुरु आहे याबाबत पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत
'मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू' अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.
हे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.
काल (गुरुवार) भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. 'लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.' असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच बंद दाराआड सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपला याचा थांगपत्ताही लागला नाही.
शिवसेनेच्या या मास्टरस्ट्रोकनंतर भाजप सध्या बॅकफूटवर गेलं आहे. तर मनसे अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही.
संबंधित बातम्या :
'लवकरच मुंबईत आमचा महापौर', सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान
मोठे दावे करणार्यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार
भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?
मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!
फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना