मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सर्व 9 डब्याच्या लोकल सेवा बंद करून 12  डब्याची लोकल सेवा आजपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आजपासून 12 डब्यांच्या 36 लोकलच्या 584 फेऱ्या सुरु होणार आहेत.

 

मध्य रेल्वेने हार्बर लाईनवर 29 मार्च 2016 रोजी 9 डब्यावरून 12 डब्यांच्या लोकलची सेवा सुरु केली होती. पण तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय मध्य रेल्वेला रद्द करावा लागला होता.

पण तरीही काही 12 डब्यांच्या लोकल सेवांसोबत 9 डब्यांच्या लोकल सुरु ठेवल्या होत्या. तीन डब्बे वाढवल्याने 33%  अधिक प्रवासी प्रवास करू शकतात असे निदर्शनास आले होते.

 

त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने या मार्गावर 584 लोकल सेवा 9 डब्यावरून 12 डब्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

 

दरम्यान, यातील सहा सेवा पश्चिम मार्गावरील सुरुच ठेवण्यात येणार आहेत. यातील पाच सीएसटी ते अंधेरी आणि एक सेवा सीएसटी ते बोरिवली या नऊ डब्ब्यांच्या लोकल सेवा कायम ठेवण्यात येणार आहेत.