मुंबई : 352 कोटींचा रस्ते घोटाळा करुन मुंबईला खड्ड्यात घालणाऱ्या कंत्रादारावर मेहरबान झालेल्या पालिकेला अखेर हायकोर्टाच्या झटक्यानंतर जाग आली आहे. मुंबई पालिकेनं काळ्या यादीतील सगळ्या कंत्राटदारांची कामं आज रद्द केली आहेत.
स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट, जे कुमार कन्स्ट्रक्शन यांची नावं आहेत. आरपीएस इन्फ्रा आणि जे कुमारकडे हँकॉक पुलासह यारी रोड, मिठी नदी आणि विक्रोळी उड्डाणपूलाचं काम दिलं होतं. आता ही कंत्राटं रद्द झाल्यामुळे नव्यानं निविदा काढून पुन्हा कंत्राटं बहाल करावी लागणार आहेत.
मुंबईतील रस्ते बांधणीत 352 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने मुंबईतील 34 रस्त्यांची पाहणी केली होती. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, काम अपूर्ण ठेवणे यांसह अनेक गंभीर बाबींचा उल्लेख या समितीने आपल्या अहवालात केला आहे.