पालघर : मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील  5  मुली व  8 मुलांसह एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. लागण झालेल्यांना उपचारासाठी जव्हारला हलविण्यात आले आहे. या प्रकारानंतर आश्रमशाळा प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


जव्हार तालुक्यातील हिरडपाडा, विनवळ आणि पालघर तालुक्यातील नंडोरे येथील आश्रमशाळांमध्ये बहुसंख्येने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी आहे. अशातच मोखाडा तालुक्यातील कारेगाव सरकारी आश्रमशाळेतही कोरोनाचा शिरकाव झाला असून  13  विद्यार्थी बाधीत झालेले आहेत. त्यांना आवश्यक उपचारासाठी जव्हारला पाठविण्यात आले असल्याचे आश्रमशाळा प्रशासनाने सांगितले आहे. 


येथील  6  मुलांपैकी 1 विद्यार्थी हा कारेगांव आश्रमशाळेत मुक्कामी होता तर इतर 5  विद्यार्थी हे तालुक्यातील नाशेरा, बेलपाडा, कुर्लोद, बोटोशी आणि राजेवाडी येथून जावून आश्रमशाळेत आले होते. हीच परिस्थिती मुलींच्या बाबतीतही झाली असून यातील  1 विद्यार्थिनी वगळता इतर तिघी करोळ-पाचघर, काष्टी आणि पोऱ्याचापाडा येथून आश्रमशाळेत दाखल झाले होते. यातील  10  विद्यार्थी हे निवासी होते तर इतर  3 विद्यार्थी हे अनिवासी होते. यातील  1  महिला कर्मचारी ही देखील कारेगावातून येवून जावून सेवा देत होती.  


जिल्ह्यातील आश्रमशाळांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने  22  मार्चपासून 9 वी आणि  11 वीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. तर   10 वी आणि  12 वीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक प्रवेश केला आहे. त्याशिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पालघर यांनी आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 


विद्यार्थ्यांकडून नियामांचं उल्लघंन  


पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेत कोरोनाचा शिरकाव होत आहे. तर जव्हार मध्ये दाभोसा आश्रमशाळेतील अधिक्षकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे, असे असतांनाही विद्यार्थ्यांच्या हालचाली अनिर्बंधपणे सुरू आहेत. लग्नसमारंभ, तालुक्यात घरी जाणे, बाहेरगावी जाणे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे बाहेर येणे जाणे सुरु आहे. त्याचाच परिणाम कोरोना पसरताना पाहायला मिळतो आहे. प्रस्तूत विद्यार्थी हे परवानगी घेवून येत जात असले तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला पायबंद घालणे आवश्यक असल्याचे मत या धर्तीवर व्यक्त केले जात आहे.