मुंबई : हनिमूनसाठी आलेल्या जोडप्याच्या प्लॅनचे तीनतेरा वाजवल्याप्रकरणी मुंबईतील एका नामांकित टूर कंपनीला दंड भरावा लागणार आहे. मुंबईतील पवई भागात राहणाऱ्या जोडप्याने संबंधित कंपनीला ग्राहक कोर्टात खेचल्यामुळे त्यांना दोन लाख रुपये दंड द्यावा लागणार आहे. 'मिड-डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
तक्रारदार जोडप्याने 2015 मध्ये संबंधित टूर कंपनीकडे व्हिसासाठी मदत मागितली होती. हनिमूनसाठी न्यूझीलंडला जाणाऱ्या जोडप्याला टूर कंपनीने सिंगापूरहून ऑस्ट्रेलियाला जाताना ट्रान्झिट व्हिसा दिला नाही. त्यामुळे सिंगापूरहून त्यांना माघारी परतण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे मधुचंद्रासाठी केलेल्या प्लॅनिंगचा विचका झाल्याने जोडप्याने परळच्या ग्राहक न्यायालयात धाव घेतली.
ग्राहक न्यायालयाने टूर कंपनीला 1 लाख 93 हजार रुपयांच्या दंडासोबत तक्रारीच्या दिवसापासून म्हणजे 30 ऑक्टोबर 2015 पासून 9 टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने प्रजेश नायर यांना 25 हजार रुपयांची नुकसानभरपाई आणि मानसिक त्रासाबद्दल 10 हजार रुपये द्यावे, असंही कोर्ट म्हणालं.
कंपनीने मात्र नायर यांनी त्यांच्या प्रवासाचा तपशील पुरवला नसल्याचा दावा केला आहे. विमानाची तिकीटं किंवा प्रवासाचे डिटेल्स नायर यांनी पुरवले नव्हते, आमच्याकडून कोणतीही हलगर्जी झालेली नाही, असा बचाव टूर कंपनीने केला. मात्र संबंधित टूर कंपनीला व्हिसाची प्रक्रिया माहित असायला हवी, त्यामुळे त्यांचा दावा तथ्यहीन असल्याचं नायर यांच्या वकिलाने म्हटलं.