मुंबई : गुरुवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये 6 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. हा पूल मुंबई महापालिकेचाच असल्याचे महापालिकेने कबूल केले आहे. या घटनेबाबत विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी पालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु पालिकेचे अधिकारी याबाबत बोलणे टाळत आहेत. तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल हे माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून पळ काढत असल्याचे आज पाहायला मिळाले. दरम्यान महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने दुर्घटनेची कोणतीही जबाबदारी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्वीकारलेली नाही.


दुर्घटना घडून एक दिवस उलटलेला आहे, तरी अद्याप पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली नाही. आयुक्तांनी केवळ दक्षता विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. 24 तासांत अहवाल द्या, असे फर्मान त्यांनी दक्षता विभागाला सोडलं आहे. परंतु अजॉय मेहता माध्यमांसमोर येण्यास तयार नाहीत, तर अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल हे माध्यमांना पाहून पळ काढत आहेत. दरम्यान अजॉय मेहता यांना अटक करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

काल (गुरुवारी )संध्याकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर स्थानिक नगरसेविका सुजाता सानप आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा पूल रेल्वेचा असल्याचे सांगून दुर्घटनेची जबाबदारी नाकारली. त्यानंतर हा पूल पालिकेचाच असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. घटनेनंतर अडीच तासांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केले की तो पूल पालिकेचाच आहे. पालिका एवढ्यावरच थांबलेली नाही, तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तसेच हे अधिकारी या घटनेबाबत बोलणेदेखील टाळत आहेत.