मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेते अभिषेक यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याला देखील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या चौघांना ही कोरोना ची लागण झाली होती. मात्र, ऐश्वर्या आणि आराध्याला लक्षणे नसल्याने घरीच होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. मात्र, आज ऐश्वर्याला ताप आणि घशात त्रास होऊ लागला तेव्हा त्यांना संध्याकाळी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.


ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्य या दोघींनाही सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीचं क्वॉरंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र, आता काही उपचारासाठी ऐश्वर्याला रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे.


अमिताभ बच्चन आणि कुटुंबियांच्या प्रकृतीत सुधारणा


कोरोनाची लागण झाल्यामुळे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये शनिवारपासून दाखल असलेले अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणाही होत आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अमिताभ यांना कफचा त्रास होत होता. आता त्यांचा त्रास 90 टक्क्यांनी कमी झाला आहे. अमिताभ यांची ऑक्सिजन लेव्हलही आता सामान्य आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होत आहे.


Health Update | अमिताभ बच्चन आणि कुटुंबियांच्या प्रकृतीत सुधारणा


अमिताभ यांचं वय आणि त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहून नियंत्रित पद्धतीने त्यांना औषधं देण्यात येत आहे. सुत्रांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांची प्रकृती स्थिर असून सध्या चिंतेचं कोणतंही कारण नाही. तसेच 77 वर्षीय अमिताभ बच्चन यांची डॉक्टर्सही काळजी घेत असून त्यांना नियंत्रित पद्धतीने औषधं देण्यात येत आहेत.'


दरम्यान, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार, अमिताभ आणि अभिषेक यांची रुग्णालयात दाखल झाल्यापासून सातव्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात येणार आहे. अमिताभ आणि अभिषेक यांची कोरोना चाचणी शुक्रवारी किंवा शनिवारी करण्यात येणार आहे.


अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा | माझा 20-20 | ABP Majha