मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हॉटेल व्यावसायिकांची 'आहार' संघटना सरसावली आहे. मतदान करुन येणाऱ्या ग्राहकांना बिलात सूट देण्यात येणार आहे.


यासाठी आहार संघटनेने आपल्या सदस्यांना पत्र लिहून ग्राहकांना सवलत देण्याचं आवाहन केलं आहे. ही सूट 5 ते 10 टक्क्यांपासून पुढे कितीही असू शकते, अशी माहिती  ‘आहार’चे सचिव संतोष शेट्टी यांनी दिली.

विशेष म्हणजे मुंबईत मतदान करुन लोणावळा, खंडाळा, माथेरानमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना तेथील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 15 ते 20 टक्के सूट मिळणार आहे.

मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाला हॉटेल संघटनाही मदत करत आहेत.

पुण्यातही निवडणूक आयोगाची ऑफर

महापालिका, जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून पर्यटनाचा आनंद लुटायला जाणाऱ्यांना लॉजिंग आणि रेस्टॉरंटमध्ये डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे.

पर्यटकांनी मतदान केल्याचा पुरावा हॉटेल व्यावसायिकांना दाखवल्यास लॉजिंगमध्ये 20 टक्के तर रेस्टॉरंटमध्ये 15 टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे. 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान या उपक्रमाचा लाभ पर्यटकांना घेता येणार आहे.

या उपक्रमातून मतदानाचा टक्का वाढण्यात हातभार लागणार असल्यानं आणि वाढत्या मतदानातून योग्य उमेदवार निवडला जाणार असल्यानं लोणावळा-खंडाळामधील शंभरहून अधिक हॉटेल व्यावसायिकांनी यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पर्यटनस्थळी राहण्यात 20 टक्के तर जेवणामध्ये 15 टक्के डिस्काऊंट मिळणार असल्यानं, पर्यटकांनी देखील मतदान करून याचा लाभ घेऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

संबंधित बातमी : मतदान करा, लॉजिंगमध्ये डिस्काऊंट मिळवा, निवडणूक आयोगाचा उपक्रम