ठाणे : ठाणे महापालिकेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या फोनची घटना सांगितली. मध्यरात्री फोन करुन आपल्या जीवाला धोका असल्याचं संजीव जयस्वाल यांनी आपल्याला सांगितलं होत, कामामुळे धोका निर्माण झाल्याची त्यांनी तक्रार केली होती, असे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील सभेत उपस्थितांना सांगितलं.
संजीव जयस्वाल यांचा मुख्यमंत्र्यांना फोन
"जयस्वाल यांचा मला एकदा मध्यरात्री फोन आला. ते म्हणाले, माझ्या कामामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. माझ्यानंतर माझ्या बायको आणि मुलांना संभाळा. यासाठी मी फोन केला आहे.", असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, "तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही", असे आश्वासन संजीव जयस्वाल यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संजीव जयस्वाल यांना ठाण्यात आयुक्त म्हणून मी पाठवले, त्यांनी अतिक्रमण काढून दाखवले, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
"दिवा हे ठाण्याचं डम्पिंग ग्राऊंड झालंय"
दिवा हे ठाण्याचं डम्पिंग ग्राऊंड झालं असून ठाणे महापालिकेनं कचऱ्याची 100 टक्के विल्हेवाट लावली नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आमची सत्ता आल्यास 1 वर्षात हे डम्पिंग ग्राऊंड बंद करु, असं आश्वासनही त्यांनी दिलं. शिवाय, सध्या ठाण्यात दलालांचा अड्डा झालाय, बिल्डरांचा अड्डा झाला आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
"ये पब्लिक है, ये सब जानती है"
"मेट्रोसाठी मी प्रयत्न केले, डीपीआरपासून टेंडरपर्यंत माझ्या सरकारने काम केले आहे. आमचे उद्धवजी म्हणतात की, मेट्रो काँग्रेसने आणली आणि ठाण्यात म्हणतात, आम्ही मेट्रो आणली, हा कोणता दुटप्पीपणा? तुम्हाला जर याचे श्रेय घ्यायचे असेल तर घ्या, लेकिन ये पब्लिक है, ये सब जानती है", असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
"ठाणे डिजिटल करणार"
ठाण्यात 2 हजार सीसीटीव्ही आम्ही लावू. संपूर्ण ठाण्यामध्ये वाय-फाय देऊ आणि 'डिजिटल ठाणे' तयार करू. त्यासाठी कॅनेडियन सरकारबरोबर आधीच करार झालेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.