मुंबई : भाजपच्या सभेत गर्दीही 'पारदर्शक' असते, म्हणून लोक दिसतही नाहीत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. मुंबईतील वडाळा येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कायम शिवसेनेवर टीकेची झोड उठवणाऱ्या मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. शिवाय, मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिले.

"मुख्यमंत्री म्हणाले, नालेसफाई आणि रस्ते घोटाळ्याला शिवसेना जबाबदार. मी उत्तर द्यायच्या आधी यांचे गोपाळ शेट्टीच बोलले, यासाठी अभियंता आणि अधिकारी जबाबदार, नागरसेवकांचा संबंध नाही. यांचे दात यांचेच लोक घशात घालत आहेत.", असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

गोपाळ शेट्टींच्या मुद्द्याला धरुनच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "रस्त्यावर खड्डा पडला तर अधिकारी आणि अभियंते जबाबदार असतील, तर हे सगळे तुमचंच प्रशासन ठरवतं. कारण टेंडर आणि अटी-शर्ती तुमचे अधिकारी तपासून आयुक्तांना रिपोर्ट पाठवतात. तो आयुक्त तुमचा असतो. मग त्यानंतर ते मंजुरीसाठी स्थायी समितीकडे येतं, ज्यात सत्ताधारी, विरोधक आणि पत्रकार असतात. अजून किती हवी पारदर्शकता? अशी पारदर्शकता तुमच्या कॅबिनेटमध्ये आहे का?"

खोटं बोलणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला हे आपलं दुर्दैव, असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, कधी तरी रात्री-अपरात्री रस्त्यावरचे खड्डे कसे बुजवतात ते रस्त्यावर येऊन पाहिलंत का? कधी सफाई कर्मचारी घाणीत उतरून कसा काम करतो ते पाहिलंय का? मी पाहिलंय."

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

  • मुंबई दंगलीनंतर श्रीकृष्ण आयोगाने आमच्या शिवसैनिकांवर ठपके ठेवले, त्यात किती भाजपवाले होते?- उद्धव ठाकरे

  • आमचे कार्यकर्ते 'गुंड' नाहीत, 'सैनिक' आहेत - उद्धव ठाकरे

  • कॅबिनेटमध्ये 'पारदर्शकता' आहे का? - उद्धव ठाकरे

  • खोटं बोलणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला हे आपलं दुर्दैव - उद्धव ठाकरे

  • माझ्या महापालिकेच्या शाळेचा दर्जा कोणत्याही शाळेच्या दर्जापेक्षा कमी नाही - उद्धव ठाकरे

  • युती तुटली बरं झालं, नाहीतर कलानींच्या रांगेत माझा फोटो छापला गेला असता - उद्धव ठाकरे

  • यापुढच्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणारच नाही, जिंकेलही - उद्धव ठाकरे

  • शिवस्मारक करणं महापालिकेचं काम नाही, सरकारचं काम आहे - उद्धव ठाकरे

  • आमच्याकडे तळमळ आहे, भाजपकडे फक्त मळ आहे - उद्धव ठाकरे

  • यांच्याकडे कमळ नाहीय, आहे तो फक्त मळ आहे - उद्धव ठाकरे

  • मेट्रोच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधानांच्या व्यासपीठावर जाण्याची इच्छा नव्हती - उद्धव ठाकरे

  • मुंबईच काय, महाराष्ट्राचा एक इंचही वेगळा होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे

  • हिंमत असेल तर, महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, अशी शपथ घ्या - उद्धव ठाकरे

  • मुंबईची अब्रू काढणाऱ्याला ठेवणार नाही - उद्धव ठाकरे

  • मी अस्सल मुंबईकर, मुंबईबद्दल नितांत आदर - उद्धव ठाकरे

  • आम्ही वचन देतो, आश्वासन नाही - उद्धव ठाकरे

  • भाजपच्या सभेत गर्दीही 'पारदर्शक', म्हणून लोक दिसत नाहीत - उद्धव ठाकरे

  • 24 तारखेला एकच मथळा असेल, 'मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा' - उद्धव ठाकरे

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

  • उद्धव ठाकरेंचं सभास्थळी आगमन

  • मुंबईतील वडाळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभा