कल्याण : कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आज पुन्हा एकदा मोठी आग लागली. या आगीमुळे डम्पिंगच्या परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं.   दुपारच्या सुमारास आधारवाडी डम्पिंगला खाडीच्या बाजूने आग लागली. या आगीची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र रात्री उशिरापर्यंत ही आग पूर्ण विझली नसल्यानं कुलिंग ऑपरेशन सुरू होतं.

आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याच्या घटना आजवर अनेकदा घडल्या आहेत. डम्पिंग ग्राउंडवर साचलेल्या कचऱ्यातून मिथेन गॅसची निर्मिती होत असून त्याला वाढत्या उष्णतेमुळे आग लागत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या आगीच्या घटनांमुळे आधारवाडी, उंबर्डे, खडकपाडा, लालचौकी, दुर्गाडी, कोनगाव या परिसरातल्या नागरिकांना धुराचा मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यामुळं यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

कल्याण शहरातल्या डम्पिंग ग्राऊंडला मार्च महिन्यात लागलेली आग बराच दिवस धुमसत होती.  धुराचे लोट संपूर्ण शहरात पसरल्यामुळे नागरिकांना श्वसनाचा, दम्याचा त्रास सुरु झाला होता. परदेशात कचऱ्यातून सोनं पिकवलं जातं. आपल्याकडे विल्हेवाट लावण्यासाठी आग लावली जाते. पण या कचऱ्यावर वेळीच प्रक्रिया केली. तर ना आग लागेल ना आरोग्य धोक्यात येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.