मुंबई : शब्द देऊनही जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारु शकले नाहीत, ते अयोध्येत राम मंदिर काय उभारणार, अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर घणाघात केला. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे.

शिवरायांच्या पुतळ्यावर छत्री उभारुन नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने अनोखं आंदोलन केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्याची घोषणा केली होती. मात्र शिवसेनेवर कुरघोडी करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींच्या डोक्यावर छत्र उभारले.

उद्धव ठाकरे नेहमी भगव्याचं राजकारण करत आले. आता अयोध्याला जाऊन फक्त राजकारण करत आहेत. मंदिर उभारण्याची त्यांची कुवत नाही, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.


शिवजयंतीला दिलेला उद्धव ठाकरेंनी इशारा

मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करुन ठेवलं आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना इथे रायगड उभा करेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करताना दिला होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 4 मार्चला पूजन करुन शिवसेनेने शिवजयंती साजरी केली होती.

विनायक मेटे चायनीज मराठा

विनायक मेटेंनी मराठा आरक्षणावर बोलूच नये. ते स्वतः मराठा आहेत का, याबाबत आम्हाला शंका आहे. मला तर वाटतं ते चायनीज मॉडेलचे मराठा आहेत. त्यांचा डीएनए चेक करण्याची गरज आहे. आम्ही मूळचे 96 कुळी मराठा आहोत, अशा शब्दात नितेश राणेंनी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा समाचार घेतला.