मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सध्या ठप्प आहे. एरव्ही क्षणाचीही उसंत नसलेले मुंबईकर लॉकडाऊनमुळे घरात आहेत. मात्र लॉकडाऊननंतर पुन्हा मुंबई लोकल सुरु होईल, तेव्हा चाकरमानी मुंबईकर पुन्हा लगेच लोकलच्या प्रवासाला सुरुवात करणार की लोकलमधल्या गर्दीपासून कोरोनाच्या भीतीने चार हात लांबच राहणार? याबाबत एम इंडिकेटरने एक सर्व्हे केला आहे. यामध्ये 62 टक्के मुंबईकरांना लॉकडाऊननंतर दोन-तीन महिने लोकल प्रवास करण्याची इच्छा नसल्याचं समोर आलं आहे.
कायम धावती असणारी मुंबई सध्या थांबलीय. कोरोनानं तिला काही काळ थांबायला भाग पाडलंय. याआधीही अनेकदा मुंबई थांबली पण संकट सरलं की लगेच पुन्हा आपल्या रुळांवर धावायलाही लागली. कोरोनाच्या संकटानं मुंबईचा श्वास असणारी मुंबई लोकल थांबलीय. पण, जेव्हा ती पुन्हा रुळांवर धावेल तेव्हा ती कशी दिसेल. गर्दीनं तुडुंब भरलेली की मोजक्याच प्रवाशांना घेऊन जाणारी.
एम इंडिकेटरनं केलेल्या सर्व्हेनुसार, 62 टक्के मुंबईकरांना लॉकडाऊन नंतर दोन-तीन महिने लोकल प्रवास करण्याची इच्छा नाही. तर 38 टक्के लोक म्हणतात लोकल सुरु झाल्या की लगेच ते लोकलनं प्रवास सुरु करतील. एम इंडिकेटरनं एकूण 56 हजार लोकांची मतं या सर्व्हेसाठी जाणून घेतली आहेत.
जर लॉकडाऊननंतर मुंबईकरांनी लोकलचा पर्याय न निवडता रस्ते वाहतुकीचा पर्याय अधिक प्रमाणात निवडला तर वाहतूक कोंडीची वेगळी समस्या निर्माण होईल. त्यासाठी लॉकडाऊन नंतरचे प्रवासाचे विविध पर्यायही खुले ठेवावे लागतील. मुंबई लोकल ही सर्वात जास्त गर्दी असलेली उपनगरीय वाहतूक सुविधा आहे. मुंबई लोकलमध्ये पूर्वीसारखीच गर्दी झाली तर त्या एकमेकांना चिटकून उभ्या असणाऱ्या गर्दीत सोशल डिस्टंसिंग आणणं अशक्यच आहे.
मुंबईत गर्दीच्या वेळी एका लोकलमध्ये जवळजवळ 4500 प्रवासी प्रवास करतात. एका स्क्वेअर मीटर जागेत 14-15 प्रवासी उभ्यानं प्रवास करतात. गर्दीनं तुडूंब भरलेल्या लोकलमधून पडून अनेक अपघातही होतात. मुंबई लोकलच्या गर्दीत प्रवास करणं लढायला जाण्यासारखंच. मात्र पोटासाठी मुंबईकर चाकरमानी दररोज ही लढाई लढतात. पण, आता जीवाच्या आणि कोरोनाच्या भीतीनं काही महिने तरी हा चाकरमानी त्याच्या या लाईफलाईनकडे पाठ फिरवेल असं दिसतंय.
Lockdown 4.0 | 'लालपरी'मधून आता मालवाहतूक, लॉकडाऊनमुळे आणि कोरोनामुळे बदलली एसटी