Ram Naik on Govinda : बॉलीवूड अभिनेता गोविंदा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राम नाईक यांनी पुन्हा एकदा गोविंदावर तोफ डागली आहे.  राम नाईक यांनी गोविंदावर निवडणुकीत पराभूत करण्यासाठी दाऊदची मदत घेतली होती, असा गंभीर आरोप केला होता. त्यांनी पुस्तकांमध्येही उल्लेख केला आहे. राम नाईक यांनी मी आठ वर्षांपूर्वी केलेल्या आरोपांवर आजही ठाम असल्याचे म्हटले आहे.  


गोविंदा परत राजकारणात येत आहे याचं आश्चर्य


दरम्यान गोविंदा पुन्हा राजकारणात सक्रिय झाला हेच आश्चर्य वाटत असल्याची टीका राम नाईक यांनी केली. नाईक यांनी सांगितले की गोविंदावर केलेल्या आरोपांवर मी अजूनही ठाम आहे. गोविंदाला कोणत्या पक्षात घ्यायचं हा त्यांचा प्रश्न असल्याचे राम नाईक म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की गोविंदा परत राजकारणात येत आहे याचं आश्चर्य वाटत असून त्यांना राजकारण देण्याचं का ठरवलं असेल? असा प्रश्न माझ्या मनात असल्याचेही राम नाईक म्हणाले. 2004 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोविंदाने निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि बांधकाम व्यवसायिक हितेन ठाकूर यांचे मदत घेतली होती असा आरोप राम नाईक यांनी केला होता. 


ते पुढे म्हणाले की माझ्या आरोपांवर मागील आठ वर्षात गोविंदाने एकदाही स्पष्टीकरण दिलेलं नाही. याचा अर्थ मी काय समजायचा? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. ते म्हणाले की जर गोविंदाला लोकसभेची उमेदवारी दिली गेली, तर त्यावेळी मी बोलेन. सध्या तरी यावर मी बोलणार नसल्याचे राम नाईक म्हणाले. जो गोविंदा गेल्या आठ वर्षांमध्ये पाच ते सहा वेळा मी राजकारणामध्ये परत येणार नाही असं बोलत होता, अनेकदा सांगत होता तो अचानक कसा काय राजकारणात येतो? अशी विचारणा सुद्धा राम नाईक यांनी केली. 


उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत... 


ते म्हणाले की, मी भाजपच्या नेत्यांची आजही विविध विषयांवर चर्चा करत असतो. मात्र, पक्षाच्या कुठल्याही दैनंदिन कारभारामध्ये माझा सक्रिय सहभाग नाही असे त्यांनी सांगितलं. 2004 च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव करण्यासाठी भीतीच वातावरण निर्माण करण्यात आलं असा आरोप सुद्धा राम नाईक यांनी गोविंदावर केला.  


ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी त्यांना अजून उमेदवारी दिलेली नाही. फक्त स्टार प्रचारक म्हणून सोबत घेतलं आहे. जोपर्यंत त्यांच्या उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या माणसाने यावरती बोलणं उचित नसल्याचेही राम नाईक म्हणाले. मी दुसऱ्या पक्षातील नेत्यांवरती टीका करणे योग्य नाही, मी कुठल्याही दैनंदिन कामांमध्ये नसून प्रत्येक पक्षाचे धोरण असल्याचे राम नाईक यावेळी नमूद केले. 


इतर महत्वाच्या बातम्या