ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वीस वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज शोधून तक्रारदाराला परत केला आहे. यासह बदललेला पत्ता शोधुन अन्य दोघा तक्रारदारांनाही 10 व 12 वर्षानंतर ऐवज परत केला आहे. सोनसाखळी चोरटयांचा छडा लावून हस्तगत केलेला ऐवज मुळ मालकांना देण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर ऐवज प्रदान करण्यात आला,अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली. दरम्यान, इतक्या वर्षानंतर ऐन गणेशोत्सवात आपला चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने तक्रारदारांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.


ठाण्यातील रूनवाल नगर येथे राहणाऱ्या प्रिया तुपे यांची 8 ग्रॅम वजनाची सोनसाखळी 2000 साली ठाणे रेल्वे स्थानक परिसरातुन चोरीस गेली होती. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्हाचा तपास करून पोलिसांनी चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला. तसेच,फिर्यादी प्रिया यांचा शोध घेवून व न्यायालयाच्या परवानगीने त्यांचे वडील महेश तुपे यांना सोनसाखळी परत केली. वीस वर्षांपूर्वी चोरी झालेला ऐवज परत मिळाल्याने महेश तुपे यांनी पोलीसांचे आभार मानले.


दुसऱ्या घटनेत पुण्यातील अमृतसिंह राजवतसिंह गरेवाल यांची दोन तोळे वजनाची सोनसाखळी 2011 साली चोरीस गेली होती. या गुन्ह्याचाही छडा लावला. तक्रारदार यांचा पत्ता बदलल्याने ऐवज परत करणे शक्य होत नव्हते. पोलिसांनी मुंबई, ठाणे, पुणे येथे वर्षभर शोध घेतला. अखेरीस गरेवाल पुण्यात असल्याचे कळल्याने पोलिसांनी दहा वर्षानंतर त्यांचा ऐवज सुखरूप परत केला.


तिसऱ्या घटनेत ठाण्यातील आझादनगर येथे राहणारे रेल्वे प्रवाशी अमित कार्ले यांच्या 32 ग्रॅम वजनाच्या तीन सोनसाखळ्या 2008 रोजी चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. या गुन्ह्याचाही यशस्वी तपास करून लोहमार्ग पोलिसांनी तब्बल 12 वर्षानंतर कार्ले यांचा बदललेला पत्ता शोधून ऐवज परत केला.लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांच्या फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्याच्या उपक्रमाअंतर्गत ठाणे लोहमार्ग पोलीसांनी लॉकडाऊन व कोरोनामुळे आपल्या कामकाजात कोणताही खंड पडू न देता तसेच तक्रारदारांचा पत्ता बदललेला असतानाही सोन्याचा ऐवज परत केल्याने प्रवाश्यांनी आभार व्यक्त केले.


Gold Chain | 21 वर्षांपूर्वी चोरी झालेली सोन्याची चेन परत मिळाली, मुंबई लोहमार्ग पोलिसांची कामगिरी