मुंबई : सोहराबुद्दीन शेख याचे थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध होते, असा गंभीर आरोप अॅड. महेश जेठमलानी यांनी केला आहे. सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणावरील मुंबई हायकोर्टातील सुनावणीदरम्यान त्यांनी हा आरोप केला.

जेठमलानी यांनी नेमका काय आरोप केला?

“सोहराबुद्दीन आणि त्याचा साथीदार तुलसी प्रजापती हे वाँटेड दहशतवादी होते. सोहराबुद्दीनचे थेट दाऊद इब्राहिमशी संबंध होते. दाऊदकडून भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी सोहराबुद्दीनला मोठी रसद पाठवण्यात आली होती. ज्यात शस्त्रांचाही समावेश होता.”, असा गंभीर आरोप जेठमलानी यांच्या वतीने करण्यात आला.

सोहराबुद्दीन एन्काऊंटर काळात सीबीआय राजकीय हेतूने प्रेरित

“कथित सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटरच्या काळातील सीबीआय ही राजकीय हेतूने प्रेरित होती”, असा खळबळजनक आरोप याप्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या राजकुमार पंडियन यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. वरिष्ठ वकील महेश जेठमलानी हे पंडियन यांच्या वतीने युक्तिवाद करत आहेत.

“गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील पोलीस सोहराबुद्दीनच्या मागावर होतेच. त्यामुळे कदाचित पकडले गेल्यावर पळून जाण्याच्या नादात त्याचा चकमकीत मृत्यू झाल्याचा बनाव तत्कालीन सीबीआयच्या वतीने करण्यात आला. कारण, तेव्हाची सीबीआय ही आजच्या इतकी निष्पक्ष नव्हती.”, असंही जेठमलानी यांच्या युक्तिवादात सांगण्यात आलं. यावर “म्हणूनच सध्याची सीबीआय हायकोर्टाला सहकार्य करत नाही का?” याचा पुनरुच्चार न्यायमूर्ती रेवती मोहीते-डेरे यांच्या खंडपीठाकडून करण्यात आला.

तत्कालीन आयपीएस अधिकारी राजकुमार पंडियन यांच्यावर सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसर बी आणि साथीदार तुलसीराम प्रजापती यांचं अपहरण करुन त्यांच्या बनावट चकमकीत हत्या केल्याचा आरोप होता. मात्र सबळ पुराव्यांअभावी त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या खटल्यातून आरोपींची निर्दोष मुक्ताता करण्याच्या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेखने हायकोर्टात आव्हान दिलंय. तर सीबीआयनेही यांतील बड्या अधिकाऱ्यांसह काहीजणांच्या निर्दोष मुक्तीला वरच्या कोर्टात आव्हान न देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय.