मुंबई : प्रकृती अस्वास्थ्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शिना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीवरील उपचार संपल्यानंतर त्याला पुन्हा आर्थर रोड कारागृहात हलवा, असे निर्देश मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. जेजेच्या तज्ञ डॉक्टरांनी हायकोर्टात तशी माहिती दिल्यानं न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी तसे आदेश दिले आहेत. तसेच जामीन सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका योग्य त्या कोर्टापुढे सादर करण्याचे निर्देशही याचिकाकर्त्यांना दिले आहेत.


शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात कैद असलेल्या पीटर मुखर्जीची बायपास सर्जरी झाली असून तुरुंगात आजारपण बळावण्याची शक्यता असल्याने आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा, यासाठी त्याने विशेष सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने पीटरचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर छातीत दुखत असल्याने 17 मार्च रोजी मुखर्जीला जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर आजारपणाचे कारण देत पीटरने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर प्रकृती अस्वस्थ्यापायी पीटरला त्याच्या पसंतीच्या खाजगी रूग्णालयात 15 दिवसांसाठी दाखल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. तसेच 12 जुलैपर्यंत पीटरच्या प्रकृतीचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला दिले होते.

मागील सुनावणीदरम्यान, पीटरवरील शस्त्रक्रियेनंतरची तंदुरुस्तीची प्रक्रिया 17 जुलैला पूर्ण होणार असल्याची माहिती पीटरच्यावतीने कोर्टात देण्यात आली. त्यावेळी जे. जे रुग्णालयातील डॉक्टरांना पीटरच्या वैद्यकीय अहवालासह हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.

जेजेतील डॉक्टरांनी पीटरचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात खाजगी रूग्णालयातील उपचार संपले की पीटरला पुन्हा जे जेतील कारागृह वॉर्डमध्ये हलवण्याची गरज नाही, अशी माहिती जे.जे.तील तज्ञ डॉक्टरांनी कोर्टाला दिली. त्याची दखल घेत पीटर मुखर्जीला पुन्हा आर्थर रोड कारागृहात हलविण्याचे निर्देश न्यायालयाने प्रशासनाला देताना कारागृहातील डॉक्टरांना नियमित तपासणी करण्याचे निर्देश देत दिले आहेत.