मुंबई : ‘मुंबई विद्यापीठानं निकाल बंदी जाहीर करावी.’ अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. निकाल वेळेत लागावेत म्हणून विद्यार्थी संघटनांना आंदोलन करण्याचीही आता लाज वाटते. अशी टीका त्यांनी केली.


या निकालांसाठी विद्यापीठानं टेंडर काढलं, स्कॅनिंगवर वारेमाप खर्च केला. अत्याधुनिक संगणकांची खरेदी केली. पण तीन महिन्यांत निकाल लागू शकलेला नाही. हा घोटाळा आहे की नाही याची चौकशी कधी होणार? असा सवालही त्यांनी केली आहे.


चौकशी करताना क्लिनचीट द्यायच्या हेतूने चौकशी करू नका, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.



दरम्यान, एकीकडे टीका सुरु असताना दुसरीकडे मुंबई विद्यापीठानं एक अजब दावा केला आहे. मुंबईत मंगळवारी पडलेला तुफान पाऊस आणि गणेशोत्सवामुळे परीक्षांचे पूर्ण निकाल लावता आले नाहीत, असा अजब दावा मुंबई विद्यापीठाने मुंबई हायकोर्टात केला आहे.


निकाल जाहीर करण्याची 31 ऑगस्टची डेडलाईनही हुकल्याने मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठावर नाराजी व्यक्त केली. पण मुंबई विद्यापीठाने आज नवी डेडलाईन हायकोर्टात सादर केली.

मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे उपनगरात अनेक ठिकाणी वीज गेली होती आणि त्यामुळे पेपर तपासणीचं काम पूर्ण करता आलं नाही, असा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. तसंच सध्या गणोशोत्सव सुरु असल्यामुळेदेखील पेपर तपासणीस विलंब झाला असल्याची माहिती विद्यापीठानं हायकोर्टानं दिली आहे.