तुर्कीच्या 'टर्किश साइबर आर्मी 'अयिल्दिज टीम'ने बिग बी यांचं ट्विटर हॅण्डल हॅक केलं होतं. ही बाब लक्षात आल्यानंतर अमिताभ यांचं ट्विटर हॅण्डल रिकव्हरही करण्यात आलं. तसंच हॅकर्सनी केलेले सर्व ट्वीट डिलीट केले आहेत.
हॅकर्सनी अमिताभ यांच्या हॅण्डलवरुन ट्वीट केलं होतं की, "हा संपूर्ण जगासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश आहे. आईसलॅण्ड रिपब्लिकने तुर्कीच्या फुटबॉल खेळाडूंना दिलेल्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो. आम्ही प्रेमाने बोलतो, पण आमच्याकडे मोठी छडीही असते. मोठ्या सायबर हल्ल्याबाबत तुम्हाला सांगत आहोत. अयिल्दिज टीम टर्किश सायबर आर्मी.''
तुर्कीचा फुटबॉल संघ काही दिवसांपूर्वी यूरो 2020 चा क्वॉलिफाईंग सामना खेळण्यासाठी आईसलॅण्डला गेला होता. तिथे पोहोचल्यानंतर तुर्कीच्या खेळाडूंची विमानतळावर कसून चौकशी करण्यात आली होती. त्याचाच निषेध अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन हॅकर्सनी केला होता.
अमिताभ बच्चन ट्विटरवर फारच अॅक्टिव्ह असतात आणि इथे त्यांचे 3.74 कोटी फॉलोअर्स आहेत. दररोज ट्विटरद्वारे ते आपले विचार नेटिझन्ससोबत शेअर करतात. ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन अमिताभ आपल्या चाहत्यांना त्यांच्या प्रत्येक घडमोडींची माहिती देत असतात.
दरम्यान,अमिताभ बच्चन यांनी आपल्या सायबर टीम आणि महाराष्ट्र सायबर टीमला याची माहिती दिली आहे. त्या प्रकरणाचा तपास सुरु आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.