मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये काल सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाने वर्दी दिली. पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा विस्कळीत झाल्याने मात्र मुंबईकरांचे हाल झाले.

मुंबईसह उपनगरात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईसह अंधेरी, सांताक्रूझ, घाटकोपर, मुलुंड या उपनगरीय भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडत होता. या पावसाने मुंबईत लोकल आणि विमानसेवेवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. पावसाने काही ठिकाणी पाणी साचलं तर अऩेक ठिकाणी झाडंही कोसळली आहेत.

या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबईलगतच्या ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली.

राज्यातही मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग

वसई

वसई विरारमध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी काही भागात रात्रीपासून बत्ती गुल होती.

भिवंडी

भिवंडी शहरातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने वर्दी दिली. शहरातील अनेक भागात बत्ती गुल झाली आहे.

रत्नागिरी

सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरीमध्ये हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह राजापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी वीज आणि फोनसेवा खंडित झाली आहे. मात्र या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

ठाणे

ठाण्यातही रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.  अचानक आलेल्या पावसामुळे काही भागात थोडावेळ वाहतूक कोंडी झाली होती.

पालघर

पालघर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. डहाणू तालुक्यातील कासा,चारोटी भागात जोरदार पाऊस झाला आहे.