मिरा-भाईंदर : महाराष्ट्रात वीजबीलं मराठीतून येणं अपेक्षित असतान देखील मीरा-भाईंदरमध्ये अदानी ग्रूपकडून ग्राहकांना गुजरातीतून वीजबिल देण्यात आलं आहे. यावर मराठी एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुन्हा बिलं गुजरातीतून वाटण्यात आली तर अदानी ग्रुपच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल, असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे.

दोन महिन्यापूर्वीच रिलायन्सकडून अदानीने कंपनी विकत घेतली होती. रिलायन्सने कधीच गुजराती भाषेत वीजबिलं दिलेली नाहीत. मात्र दुसऱ्यामहिन्यातच अदानीने चक्क गुजराती मध्ये बिल वाटप केल्याने मराठी लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

महाराष्ट्रात गुजराती भाषेचं वाढतं प्रस्थ हे मराठी प्रेमींची नेहमी डोकेदुखी आणि चीड ठरत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्रात मराठी भाषा अन्विवार्य आहे. त्रिभाषा सत्राप्रमाणे महाराष्ट्रात राज्यभाषा मराठीच पाहिजे होती. मात्र ज्या राज्याचा इथे काहीही संबंध नाही अशा गुजराती भाषेचे विजबिल वाटप झाल्याने मराठी माणसांकडून याबद्दल संताप व्यक्त होत आहेत.