कल्याण : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रामदास आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना एका तरुणानं धक्काबुक्की केली. आठवलेंच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करणाऱ्याला बेदम चोप देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण गोसावी या तरुणाने आठवलेंना धक्काबुक्की केली. त्यानंतर आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविणला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहे.
रामदास आठवले वैयक्तिक स्वार्थासाठी आंबेडकरी जनतेचा वापर करुन घेत आहेत. याच रागातून प्रविण गोसावीने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. प्रविण आठवलेंविरोधात सोशल मीडियावरहरी लिहीत होता, त्यामुळे हा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र प्रविण शुद्धीवर आल्यानंतरच त्याने आठवलेंना धक्काबुक्की का केली याचं नेमकं कारण समोर येईल.
विशेष म्हणजे प्रविण आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असून तो काही काळ आरपीआयचा सक्रीय कार्यकर्ता होता, अशीही माहिती समोर येत आहे.
अंबरनाथमध्ये या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मागासर्गीय नेत्यांनीही आठवलेंना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला आहे.