मुंबई : भारतामध्ये मोदी समर्थक आणि मोदी द्वेष्टे असे दोन वर्ग तयार झाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या समर्थकांना भक्त संबोधलं जाऊ लागलं आहे. अनेकदा भाजपच्या विरोधी मतांची मंडळी भाजपसह त्यांच्या समर्थकांनाही अनेक प्रश्न विचारत असतात. स्वरा भास्कर, अनुभव सिन्हा आदी मंडळी यात आघाडीवर असतात. मराठीमध्ये सर्वसाधारणपणे थेट टीका वा प्रश्न कुणी विचारत नाही. याला अभिनेता, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव अपवाद ठरला आहे.


प्रियदर्शन जाधव आपल्या ट्विटरवरून सतत बोलत असतो. आपली मतं मांडत असतो. भूमिका घेत असतो. अलिकडे त्याने राष्ट्रवादी पक्षातही प्रवेश केला आहे. त्यानंतर त्याच्या टीका-टीप्पणीला धार आली आहे. आज पुन्हा एकदा प्रिदर्शन जाधवने ट्वीट करत मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न विचारतानाच उपहासात्मक टिप्पणीही केली आहे.


आपल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो, नोटबंदी केली. त्यानंतर कुणाचा काळा पैसा भारतात आणला.. कुठला पैसा आणला.. कधी आणला.. कसला खुलासा केला.. काही लोकांचा रांगेत उभं रााहून जीव गेला त्याचं काय केलं.. असे प्रश्न विचारत प्रियदर्शनने वर तिरकस टिप्पणीही केली आहे. तो म्हणतो झालं इतकंच की अंबानी आणि अदानी भरभरून भरले आणि बापू कलरफुल झाले.





हे ट्वीट करताना प्रियदर्शनने कुणाचंही नाव घेतलेलं नाही. कुणालाही टॅग केलेलं नाही. पण यातून नोटबंदी आणि काळ्या पैशाचे संदर्भ असल्याने हा मुद्दा थेट मोदी सरकारला उद्देशून लिहिला आहे हे उघड आहे. यावर विविध सूर उमटले आहे. काहींनी प्रियदर्शनच्या पोस्टला दुजोरा दिला आहे. तर काहींनी प्रियदर्शनला ट्रोल करायलाही सुरूवात केली आहे. यावर अद्याप कुण्या भाजप नेत्याने उत्तर दिलेलं नाही.