नवी मुंबई : कोरोनावर औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे हाच सध्यातरी सर्वोत्तम उपाय आहे. याबाबत अनेकवेळा जनजागृती करूनही नागरिकांमध्ये तितकीशी गंभीरता दिसून येत नाही. त्यामुळे अखेर नवी मुंबई मनपाला कायद्याचा बडगा उगारायला लागला. कोरोनाचे नियम तोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करीत 28 लाखाचा दंड महानगरपालिकेकडून वसूल करण्यात आला आहे.


यामध्ये मास्क न घालणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न राखणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकानांमध्ये जास्त ग्राहकांना प्रवेश देत गर्दी करणे आदी कारणांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने गेल्या काही दिवसांत नवी मुंबईतील कोरोना पॉझिटीव्ह संख्या दिवसाला 350 ते 400 च्या घरात गेली आहे. मनपा प्रशासनाकडून कोरोना काळात आखून दिलेले नियम पाळून बाहेर पडा अशी वारंवार सुचना देऊनही काही नागरिक याकडे कानाडोळा करीत आहेत. कोरोनाचे नियम तोडणाऱ्या लोकांमुळेच संसर्ग पसरण्यास हातभार लागत असल्याने अशा बेफिकिर नागरिकांवर कायद्याने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी मनपा प्रशासनाला दिले होते. यानंतर राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये कोरोनाचे नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मनपा प्रशासनाने कोरोना नियम तोडणाऱ्यांकडून 28 लाख 16 हजाराचा दंड वसूल केला आहे. यामध्ये नागरिकांबरोबर दुकानदारांचाही मोठा सहभाग आहे.


कोरोना काळात लोककलावंतांवर उपासमारीची वेळ, सरकारने मागण्यांकडे अन्यथा आंदोलनाचा इशारा


नियम तोडणाऱ्या नागरिकांना समज मिळावी याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या दंडात्मक कारवाईतून सर्वच नागरिकांना या गोष्टींचे महत्व कळावे ही मुख्य भूमिका आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून रूपये 1 हजार, मास्क न लावणाऱ्या व्यक्तीकडून रूपये 500, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या व्यक्तीकडून रूपये 200 व व्यापारी/दुकानदार यांचेकडून रूपये 2 हजार अशाप्रकारे दंड वसूल करण्याचे महानगरपालिकेमार्फत कोव्हीड 19 च्या अनुषंगाने जाहीर करण्यात आले होते.


वसूल करण्यात आलेली रक्कम खालीलप्रमाणे




  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून 26 हजार,

  • मास्क न लावणाऱ्या व्यक्तींकडून 11 लाख 11 हजार 800

  • सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या व्यक्तींकडून 1 लाख 56 हजार 10

  • सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या व्यापारी/दुकानदार यांचेकडून 15 लक्ष 22 हजार 800

  • अशाप्रकारे एकूण 28 लाख 16 हजार 700 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.


NMMC | नवी मुंबईतील खासगी हॉस्पिटलना दणका; 32 लाख परत करण्याचे आयुक्तांचे आदेश