मुंबई : मुंबईतील भूमिगत मेट्रो प्रकल्प मेट्रो 3 वरील वरळी नाक्यावरील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्यानं विरोधी पक्षांकडून मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. सरकारवर मेट्रो स्टेशनच्या कामावरुन टीका करण्यात आली होती. आता त्या घटनेप्रकरणी  आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड करण्यात आल्याची माहिती आहे. 

निष्काळजीपणा, नियोजनातील त्रुटीमुळं दंड

मुंबईत मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. 26 मे 2025 रोजी आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं. याप्रकरणी चौकशीत निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी आढळल्याने कंत्राटदाराला दंड करण्यात आला आहे. डोगस-सोमा जेव्ही (DOGUS-SOMA JV) या कंपनीला 10 लाखांचा दंड करण्यात आला आहे. 

मेट्रो स्टेशनमध्ये पाणी येण्याची घटना मुख्यत्वे B2 एंट्री/एक्झिट इंटरफेसवर बसवलेल्या तात्पुरत्या फायर बॅरियर सिमेंट प्रीकास्ट पॅनेल वॉलमध्ये बिघाड झाल्यामुळे घडल्याच समोर आलं आहे.  बॅरिअर फुटल्यामुळे पावसाचे पाणी आणि कचरा स्टेशन बॉक्समध्ये प्रवेशला, ज्यामुळे चिखल साचला आणि पाण्याचा प्रवाह प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स, अंडर क्रॉफ्ट लेव्हल, AFC सिस्टम, सिग्नलिंग, टेलिकॉम, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि कंट्रोल रूम पर्यंत पोहोचला होता. 

या पाण्यामुळे स्टेशनवरील आर्किटेक्चरल डिझाइन/सजावटीचे नुकसान झाले आणि प्रवासी सुविधांवर प्रतिकूल परिणाम झाला त्यामुळे तात्काळ सेवा बंद करावी लागली होती. मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीने पूर्वी EE-B3 वर एक समर्पित डिवॉटरिंग सिस्टीम बसवलेली होती.यामध्ये अनेक पंप होते, जे नियमित पाणी गळती व पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी सक्षम होते. 

मात्र, घटनेच्या वेळी कंत्राटदाराचा ऑपरेटर पाणी शिरत असल्यावर वेळेवर कृती करण्यात अपयशी ठरला. पंप वेळेवर सुरु न झाल्यामुळे पाणी संपूर्ण स्टेशनमध्ये पसरले या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत सीजी/चीफ प्रोजेक्ट मॅनेजर -1 राजेश कुमार मित्तल यांनी कंत्राटदार डोगस-सोमा जेव्हीला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या कंपनीचा दोष निश्चित झाल्यानंतर ₹10 लाखांचा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.

डोगस सोमा जेव्ही कंपनीवर 10 लाखांचा दंड लादण्यात आला. मात्र, संबंधित मेट्रो अधिकारी यांच्यावर मात्र काहीही कारवाई नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना आरटीआयच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. मेट्रो 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी पर्यंत सुरु करण्यात आला होता. त्यानंतर बीकेसीपासून मेट्रो 3 ची सेवा वरळी नाक्यावरील आचार्य अत्रे चौक स्टेशनपर्यंत सुरु करण्यात आली होती.