नालासोपारा : नालासोपाऱ्यातील भाजपा महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण यांच्या हत्येचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. घरातील घरकाम करणाऱ्या 20 वर्षीय मुलानेच रुपालीची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. नितीन चाफे असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

हत्या झाल्यानंतर अवघ्या 24 तासात नितीन चाफे याला त्याच्या मूळ गावी लातूर जिल्ह्यातून नालासोपारा पोलिसांनी अटक केली. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी रुपाली चव्हाण यांची नालासोपारा पश्चिम येथील निलेमोरे येथील साई लीला या इमारतीत त्यांच्या रहत्या घरी हत्या करून आरोपी फरार  झाला होता.

रुपाली पाच वर्षापासून आपल्या पतीपासून विभक्त रहात होत्या. यंदाच्या वर्षी जुलै महिन्यापासून नितीन हा रुपाली यांच्या घरी घरकाम करण्यासाठी कामाला लागला होता. घरातील किरकोळ कारणावरून आरोपीला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून व घरातील पैसाही हडप करण्याच्या कारणावरून रुपालीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी न्यायायलयाने ठोठावली आहे.