मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकावर एसीबीची धाड
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2018 11:42 AM (IST)
मनसेतून शिवसेनेत गेलेले मुंबई महापालिकेचे नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या चौकशीत कायदेशीर उत्पन्नापेक्षा 64 टक्के अधिक संपत्ती सापडली आहे.
मुंबई : एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल (मंगळवार) मुंबई आणि ठाण्यात मोठ्या कारवाया केल्या. मनसेतून शिवसेनेत गेलेले मुंबई महापालिकेचे नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या चौकशीत कायदेशीर उत्पन्नापेक्षा 64 टक्के अधिक संपत्ती सापडली आहे. त्यामुळे एसीबीनं याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआरआय दाखल केली आहे. 2007 ते 2012 दरम्यान आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर ही चौकशी केली गेली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईत झालेल्या पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मुंबईत मनसेकडे अवघा एकच नगरसेवक उरला आहे. या संपूर्ण घडामोडीनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच शिवसेनेनं या प्रकरणात मोठा घोडेबाजार केल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर आता परमेश्वर कदम यांच्यावर लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली आहे. दुसरीकडे मनसेनं सहाही नगरसेवकांचं पद रद्द व्हावं अशी याचिका कोकण भवन आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणाची अद्यापही सुनावणी सुरु आहे. अधिकाऱ्यांवरही कारवाई दरम्यान, नगरसेवक परमेश्वर कदम यांच्याशिवाय महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्रधिकरणातील कार्यकारी अभियंता दिपक विष्णू पवार यांचीही लाचलुचपत विभागाकडून चौकशी झाली. त्यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नापेक्षा 66 टक्के अधिक संपत्ती आढळली आहे. तर तिकडे ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला 1 लाखांची लाच घेताना काल अटक करण्यात आली आहे. VIDEO : संबंधित बातम्या : मनसेच्या मुंबईतील 6 नगरसेवकांचा सेनाप्रवेश अधिकृत : सूत्र 'बहू भी कभी सास बनती है’, हे लक्षात ठेवा : बाळा नांदगावकर कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना