मुंबई: मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमनं आता लग्न करण्याकरता टाडा कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे.
सालेमला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रितसर लग्न करायचं आहे, असं त्याने कोर्टाला सांगितलं. त्यासाठी जामीन अथवा पॅरोलवर सोडण्याची विनंती त्यानं कोर्टाला केली आहे. टाडा कोर्टानं सीबीआयला यासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्यावर्षी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचे धावत्या ट्रेनमध्ये लग्न झालेले आहे अशी बातमी फोटोसह एका वृत्तपत्रात आली होती. ठाण्याजवळच्या मुंब्र्यातील कौसर नावाच्या एका मुलीशी 2014 साली अबू सालेमने धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते. ज्यात कौसर अबू सालेमसोबत ट्रेनमध्ये दिसत होता.
हे फोटो आल्यानंतर स्वत: अबू सालेमनही मुंब्र्यातील कौसर नावाच्या या मुलीसोबत आपले संबंध असल्याचे न्यायालयात कबूल केले होते. एवढचं नाही तर, आपल्याला त्या मुलीशी लग्न करायचे आहे, त्याकरता परवानगीदेखील अबू सलेमने न्यायालयाकडे मागितली होती.
लिस्बन, पोर्तुगाल येथून अबू सालेमचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अबू सालेमवर गंभीर स्वरुपाचे खटले सुरू आहेत, त्यामुळे त्याला बऱ्याचदा दुसऱ्या राज्यांतील कोर्टात ट्रेनने नेल- आणलं जातं.
अबू सालेमशी ट्रेनमध्ये लग्न झाल्याच्या खोट्या बातम्यांमुळे आपलं जगणं मुश्किल झालं आहे, त्यामुळे आता मला अबू सालमेशीच लग्न करावं लागेल असं कौसरने 2016मध्ये टाडा कोर्टात म्हटलं होतं.
1993 च्या साखळी बॉम्ब स्फोटात महत्वाची भूमिका बजावल्याच्या आरोपात टाडा न्यायालयानं अबू सालेमला दोषी ठरवलं आहे. सीबीआयने सालेमकरता जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली आहे.