मुंबई : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांच्या भाच्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बेड्या ठोकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याच्या आरोपावरुन कासिमला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.


अबू असलम कासिमला मुंबईच्या वाकोल्यातील एका पंचतारांकित हॉटेलमधून अटक झाली. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये कासिमचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. कासिम या हॉटेलात मंगळवारी रात्री आपल्या मैत्रिणीसोबत आला होता. त्यावेळी दिल्लीच्या स्पेशल सेलचे पोलिस उपायुक्त संजीव यादव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या छापेमारीत अंमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला होता. त्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघांना अटक करत त्यांची चौकशी सुरु केली, तेव्हा हे ड्रग्ज कासिमनेच पुरवल्याचा दावा त्यांनी केला. कासिम हा ड्रग्ज प्रकरणातील देशातील मोठा तस्कर असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

कासिम हा जगभरात अंमली पदार्थांची तस्करी करत होता. अमेरिकेत तो कुरिअरमार्फत ड्रग्ज पुरवत असल्याचीही माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती.