मुंबई :   एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी त्याचा धोका कायम आहे. मात्र याचे भान नेत्यांना दिसत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. सामान्य लोकांना कोरोनाचे निर्बंध असले तरी राजकीय नेत्यांचे वाढदिवस, सभा, रॅली, समारंभ मात्र सुरुच आहेत. असाच एक प्रकार काल मुंबईत समोर आला. काल मुंबईच्या शिवाजी नगर गोवंडी विभागाचे आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली. ही मिरवणूक काढल्याप्रकरणी आमदार अबू आझमी यांच्यासह अनेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी  यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर मुंबईत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तलवारीने केक कापणे आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


अबू आझमींचं हातात तलवार घेऊन प्रदर्शन  
या शेकडोच्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी झाले होते. यावेळी फटाके फोडून, घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कहर म्हणजे यावेळी अबू आझमी यांनी हातात तलवार घेऊन तिचे प्रदर्शन देखील केले. यावेळी पोलीस मात्र बघाच्या भूमिकेत दिसून आले. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. याबाबत अबू आझमी यांना विचारले असता त्यांनी हे कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचे सांगितले. तसेच ती तलवारी मारण्यासाठी नव्हती, आम्ही पूरग्रस्तांना मदत गोळा करीत आहोत अशी सारवासारव केली आहे.


या प्रकरणी  आमदार अबू आझमी यांच्यासह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक आदेश व जमावबंदी आदेशाचा भंग केला. तसंच अबू आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार हे हत्यार बाळगलं असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणात आमदार अबू आझमी, फहाद खान उर्फ आझमी, इरफान खान, गैसउददिन शेख, आयशा खान, अक्तर कुरेशी, मनोज सिंग, सद्दाम खान, तौसीफ खान, जावेद सिद्दिकी, नौशाद खान, वसिम जाफर शेख, अकबर खान, इर्शाद कुरेशी ऊर्फ बबलू लोटस, रईसा सय्यद, शेहजाद ऊर्फ सय्यद, शकील पठाण, रुक्साना सिद्दिकी आणि इतर काही अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.