मुंबई : पनवेलमधील आयटीआयच्या (Panvel IIT College) हॉस्टेलची दूरवस्था एबीपी माझाने दाखवल्यानंतर राज्य सरकारने त्याची तातडीने दखल घेतली आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्याच आयटीआयच्या सर्व प्राचार्यांसोबत झूम मीटिंगद्वारे बैठक बोलावली आहे. तसेच आयटीआयचे हॉस्टेलचा प्रश्न आणि त्याच्या समस्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल एबीपी माझाचे आभार मानले आहेत.
पनवेलमधील आयटीआयच्या हॉस्टेलची इमारत 2014 साली धोकादायक ठरवूनही त्याच ठिकाणी वर्ग भरवले जातात. जवळपास आठ वर्ष हजारो विद्यार्थ्यांनी जीवमुठीत घेऊन शिक्षण घेतल्याचे वास्तव एबीपी माझाने दाखवल्यानंतर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दखल घेतली आहे. एका महिन्याच्या आत आयटीआयच्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला बदल दिसतील असे आश्वासन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहे.
आयटीआयच्या प्राचार्यांसोबत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्या तातडीची बैठक बोलावली आहे. आयटीआय हॉस्टेल संदर्भात निधी नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पुढच्या वर्षभरात आयटीआयच्या होस्टेलचे प्रश्न सोडवण्यासारखी सरकार कटीबद्ध असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले.