मुंबई : लॉकडाऊन काळात अनेक कलावंतांना चटके सोसावे लागले. अनेकांना अनेकांनी मदत केली पण ती प्रत्येकवेळी पुरेशी पडलीच असं झालं नाही. त्यातही रंगमंच कामगार, कलाकार यांच्याकडे लक्ष दिलं गेलं. पण लोककलावंत मात्र तुलनेनं उपेक्षित राहिला. यात एकएकट्या कलावंतांवर मुश्कील ओढवली. अशातलाच एक कलावंत होता हरदास गुरव अर्थात हरिओम तुतारीवाला. एबीपी माझाच्या वेब एक्सक्लुझिव्ह बातमीमुळे मात्र त्याला मदत मिळाली आहे. दस्तुरखुद्द शिवसेनाच या मदतीला धावून आली आहे.


हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभांना जी तुतारी वाजायची ती वाजवणारा अवलिया आहे हरदास गुरव. त्यांना हरिओम तुतारीवाले म्हणूनही ओळखलं जातं. लॉकडाऊन काळात हरदास आर्थिक विवंचनेत सापडला. जवळपास 40 हजार रुपयांचं थकलेलं भाडं, दहा हजाराच्या आसपास आलेलं सात महिन्यांचं लाईट बिल आणि सोबत असलेला किडनीचा विकार असं सगळं सावरत हरदास बळेबळे दिवस ढकलत होता. पण पुढे घरमालकाची चौकशी सुरु झाली. किडनीवरही उपचार होणं गरजेचं होतं. अनेकांकडे मदत मागूनही न मिळाल्याने आत्महत्या करण्याचे विचार हरदासच्या मनात येऊ लागले. एबीपी माझाने ही त्याची स्थिती लक्षात घेऊन त्यावर बातमी केली. त्या बातमीची दखल दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी तातडीने घेतली.



'बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, आता जगणं संपवावं वाटतंय!' हरिओम तुतारीवाल्याची कैफियत


सकपाळ यांनी हरदासला बुधवारी कार्यालयात बोलवलं. पत्नीसमवेत हरदास दिलेल्या वेळेत हजर झाला. सकपाळ यांनी त्याची चौकशी करून थकलेल्या घरभाड्याचा 40 हजाराचा चेक आणि वीज बिलाचा 10 हजाराचा चेक तातडीने हरदास यांना दिला. शिवाय, किडनीच्या उपचारासाठी जेजेमधल्या डॉक्टरांना सूचनाही केली आहे. याबाबत हरदासने सकपाळ आणि शिवसेनेचे आभार मानले. याबद्दल माझाशी बोलताना सकपाळ म्हणाले, 'तुतारीवाल्याची बातमी माझ्या वाचनात आल्यानंतर शक्य ती मदत करायला हवी असं वाटलं. मुख्यमंत्री आणि आमचे नेते उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरदास यांना मदत करायचं ठरलं. त्यानुसार घरभाडं आणि वीज बिलाचा चेक त्यांना सुपूर्द केला आहे. शिवाय आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकण्याबद्दलही त्यांना सांगितलं आहे. जेजे मधल्या डॉक्टरांशीही बोलणं झालं असून, आवश्यक ते सर्व सहाय्य केलं जाईल.'